

सातारा : पुणे-मिरज दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत निरा यार्ड येथे पायाभूत सुविधांचे काम करण्यात येणार आहे. मार्गावर ब्लॉकची कामे ५ ते २५ जून या कालावधीत करण्यात येणार आहेत. सुमारे २१ दिवस ही कामे केली जाणार असल्याने मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या काही रद्द करण्यात येणार आहेत तर काही उशिराने धावणार आहेत. या कामामुळे रेल्वे सेवांवर परिणाम होणार असल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
पुणे-मिरज दुहेरीकरण प्रकल्पाशी संबंधित निरा यार्डच्या नूतनीकरणानंतर ते कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण आणि सुरक्षिततेची कामे हाती घेतली जाणार आहेत. यासाठी मध्य रेल्वेचा पुणे विभाग ‘प्री-नॉन-इंटरलॉकिंग’ आणि ‘नॉन-इंटरलॉकिंग’ ब्लॉक घेतला जाणार आहे. परिणामी, रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या वेळापत्रकात बदल जाहीर केले आहेत. यामध्ये काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तर काही गाड्यांच्या प्रवासाची समाप्ती किंवा सुरुवात निर्धारित स्थानकाआधीच करण्यात येणार आहे. तर काही गाड्यांचा मार्ग बदलला जाणार आहे तर काही गाड्या थांबवून ठेवण्यात येणार आहेत. तसेच काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे.
पुणे ते फलटण मार्गावर धावणारी डेमू रेल्वे दि. १७ ते २५ जूनपर्यंत रद्द तर लोणंद ते फलटण मार्गावर धावणारी रेल्वे १७, १९ व २५ रोजी रद्द तर पुणे ते सातारा डेमू १९ व २५ रोजी रद्द तर सातारा-पुणे मार्गावर धावणारी डेमू रेल्वे दि. १७ ते २५ जून अखेर रद्द केली जाणार आहे. कोल्हापूर पुणे धावणारी डेमू रेल्वेचा ९,१६, २२ व २३ जून रोजी सातारा येथे तर दि. १९ व २५ रोजी लोणंद येथे प्रवास थांबवला जाईल. बिकानेर मिरज एक्सप्रेसचा प्रवास दि. १५ रोजी खडकी येथे तर हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास दि. १९ रोजी सातारा येथे थांबवला जाईल. पुणे कोल्हापूर डेमू रेल्वे सातारा स्थानकावरून दि. ९ ते २४ जूनपर्यंत तर दि. १९ व २५ रोजी लोणंद स्थानकावरून सुटणार आहे. मिरज बिकानेर एक्सप्रेस ही दि. १६ रोजी खडकी स्थानकावरुन सुटणार आहे तर पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस दि. १९ रोजी सातारा स्थानकावरून सुटणार आहे.
निजामुद्दीन वास्को एक्सप्रेस दि. २४ रोजी मनमाड, दौड, कुर्डुवाडी मिरज मार्गे वळवण्यात येणार आहे. कोल्हापूर-पुणे डेमू रेल्वे दि. ५ ते १४ जूनअखेर सालपे स्टेशन येथे काही कलावधीसाठी थांबवण्यात येणार आहे. तर बेंगळूर गांधीधाम एक्सप्रेस दि. ६ रोजी लोणंद तर १३ जून रोजी सालपे येथे काही कालावधीसाठी थांबवली जाणार आहे. बेंगळूर एलटीटी मुंबई एक्सप्रेस दि. ६, ९ व १३ जून रोजी मिरज-लोणंद दरम्यान थांबवली जाणार आहे. तर अहमदाबाद-कोल्हापूर एक्सप्रेस ही दि. ६ रोजी लोणंद स्टेशन येथे थांबवण्यात येणार आहे.
म्हैसूर-अजमेर एक्सप्रेस दि. ९ रोजी सालपे, बेंगळूर-जोधपूर एक्सप्रेस दि. १० व १४ रोजी सालपे, कोल्हापूर सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस दि. १९ रोजी सालपे, कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस दि. २० व २२ रोजी वाल्हे स्टेशन येथे थांबवली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. पुणे-मिरज मार्गावरील रेल्वे वाहतुकीची भविष्यातील सुरक्षितता, वेग आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी हे पायाभूत सुविधांचे काम (ब्लॉक) अत्यंत आवश्यक असल्याचेही म्हटले आहे.