

सातारा : एरव्ही गांजाची कारवाई करून शाबासकी म्हणून स्वत:चा ऊर बडवून घेणाऱ्या मेढा पोलिसांचा मुंबई पोलिस ब्रँचच्या कारवाईने ‘अंधा कानून’ कारभार समोर आला. ड्रग्जची सर्वात मोठी कारवाई जावलीत होत असताना अनभिज्ञ राहिलेल्या मेढा पोलिसांची पुरती नाचक्की झाली. कोसो दूर असलेल्या मुंबईच्या पोलिसांना जावलीतील ड्रग्ज साठ्याची माहिती कळतेय मात्र दस्तूरखुद्द मेढा पोलिसांनाच त्याचा सुगावाही लागला नाही. ‘गांजा दाखवायचा आणि एमडी लपवायचा’ असा प्रकार होत असेल तर सातारा पोलिस अधीक्षकांनी याची झाडाझडती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
जावली तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात सावरी हे गाव येते. बामणोलीपासून काही अंतरावर कडेकपारीत असलेल्या एका शेडमध्ये मुंबई पोलिसांनी शनिवारी पहाटे एमडी ड्रग्जची फॅक्टरी उद्ध्वस्त केली. या कारवाईदरम्यान मेढा पोलिसही हजर होते. कारवाईची संपूर्ण सुत्रे मुंबई क्राईम ब्रँचकडे होती. त्यांना मिळालेल्या टीपनुसार हे पोलिस इथपर्यंत पोहोचले होते. त्यांना जी काय माहिती मिळाली त्यानुसार छापेमारी सुरू होती. ज्यांच्या कार्यक्षेत्रात हे ठिकाण येते ते मेढा पोलिस मात्र या कारवाईवेळी हाताची घडी तोंडावर बोट अशा हताश अवस्थेत बघत उभे होते. सुमारे 250 ते 300 कि.मी. अंतरावरून आलेले मुंबई पोलिस आपल्याच बालेकिल्ल्यात अशी धाडसी कारवाई करत असताना आपल्याला आत्तापर्यंत या ड्रग्ज फॅक्टरीचा सुगावा कसा काय लागला नाही, अशा चिंतेच्या स्वरात मेढा पोलिसांचे हावभाव दिसत होते.
मेढा पोलिस अनेकदा थातूरमातूर कारवाया करून अवैध धंदेवाल्यांना धडा शिकवल्याच्या थाटात वावरत असतात. अनेकदा तर दारूअड्डे, जुगार अड्डे यांच्यावर तोंडदेखली कारवाई करून संशयितांसोबत वाघ मारल्याच्या अविर्भावात फोटो काढून धडक कारवाई केल्याच्या बाता मारत असतात. मात्र, याच मेढा पोलिसांना आपल्याच कुशीत सुरू असलेल्या सर्वात मोठ्या ड्रग्जच्या साठ्याची माहिती मिळत नाही. ही बाब मेढा पोलिसांसाठी कमीपणाची असल्याची भावना जावली तालुक्यातून व जिल्हा पोलिस दलातून व्यक्त होतआहे.
त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनीच आता मेढा पोलिसांना कानपिचक्या देण्याची गरज आहे. मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत कारवाई केल्यानंतर त्याची लिंक सातारा जिल्ह्यातील सावरी गावापर्यंत आली. यामुळे पोलिस देखील चक्रावून गेले. शनिवारी भल्या पहाटे मुंबईचे पथक जावली तालुक्यातील सावरीत येवून कारवाई करतात काय?, मेढा पोलिस बघ्याची भूमिका घेतात काय? सारेच मेढ्याच्या पोलिसांना आत्मपरिक्षण करायला लावणारे होते.