

सणबूर : राज्यासह कराड-पाटण तालुक्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असून कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी बाहेर पडणे कठीण झाले असून अंगाची लाहीलाही होत आहे. या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळवण्यासाठी ढेबेवाडी विभागातील नागरिकांनी आता मराठवाडी (ता. पाटण) येथील धरणाकडे मोर्चा वळवला आहे. मात्र धरणातील पाण्याचा अचूक अंदाज येत नसल्याने खोल पाणी, गाळ किंवा अचानक उतार यामुळे बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उन्हाळ्यामुळे धरणातील पाणीसाठा काही प्रमाणात घटला असला, तरी याच कमी पाणीपातळीचा फायदा घेत परिसरातील तरुण, लहान मुले तसेच अबालवृद्ध मोठ्या संख्येने पोहण्यासाठी धरणात उतरताना दिसत आहेत. दुपारनंतर आणि सायंकाळच्या वेळेत सहकुटुंब पर्यटकांची मोठी गर्दी होत असून, हे ठिकाण स्थानिकांसाठी ‘थंडावा मिळवण्याचे हॉटस्पॉट’ ठरत आहे. धरणात काही भागात गाळ साचलेला असल्याने पाय अडकण्याचा धोका अधिक वाढतो.
अशा भीषण परिस्थितीतही प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे चित्र दिसत असून, कोणतीही सुरक्षा व्यवस्था, सूचना फलक किंवा देखरेख यंत्रणा नसल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. धरण परिसरात तातडीने सुरक्षा रक्षक नेमावेत, धोकादायक भागात इशारा फलक लावावेत आणि पोहण्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या पुढाकारातून वांग-मराठवाडी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आणि प्रत्यक्ष धरणात पाणी अडवण्याचे काम पूर्ण झाले. यामुळे परिसरातील बागायती शेतीला मोठा दिलासा मिळाला असून, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटला आहे. धरणात पाणी साठल्याने वांग नदीला बारमाही पाणी वाहू लागले असून, विकासाच्या दृष्टीने हा मोठा टप्पा मानला जात आहे. तथापि, वाढती पर्यटकांची गर्दी आणि सुरक्षेचा अभाव ही गंभीर बाब ठरत असून, प्रशासनाने वेळीच योग्य ती खबरदारी न घेतल्यास अनर्थ ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.