

स्वराज्यरक्षक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी/सातारा : या देशाच्या भूत-भविष्याच्या विचाराला आरंभ होण्याआधी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या गाभ्याला साहित्य संमेलनाने हात घातला आहे. मायमराठीच्या अस्तित्वाची लढाई आता आपल्या प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे.
उद्या तुमच्या देव्हाऱ्यावर विठोबा समवेत ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या प्रतिमा टिकाव्यात, असे वाटत असेल, तर वेळीच झोपेतून जागे व्हा! तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही जातीचा, पक्षाचा वा धर्माचा असूदे. त्याचा दांडा हा मराठीच असायला हवा. तुमच्या खांद्यावर पालखी कोणाचीही असूदे. तिचा गोंडा मराठीच असायला हवा, अशी आग्रही भूमिका 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी मांडली.
अध्यक्षीय भाषणात पाटील म्हणाले, साहित्य संमेलन म्हणजे केवळ हौशागौशांची जत्रा नसते. कोणा वधू-वरांच्या लग्नाचे ते वऱ्हाडही नव्हे, तर महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृती आणि अस्तित्वाला आकार व दिशा देणारी सर्वमान्य अशी प्रागतिक संघटना म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय. लेखक किंवा कवीला कोणतीही जात नसते. मात्र, त्याला धर्म असतो. जो धर्म असतो तो फक्त मानवता धर्म. जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा-तेव्हा गेल्या दोनशे वर्षांत सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकाही साहित्यिकांनी उचललेली आहे. कवीच्या हृदयातून आलेले सच्चे शब्द प्रसंगी सत्तेच्या सिहांसनासमोर झुकत नाहीत, हे या भूमीतल्या साहित्यिकांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मी ज्या जिल्ह्यांच्या मुख्यालयात ग्रंथ विक्रीची दुकाने नाहीत, तिथे स्वत: जाऊन मराठी भाषक आणि ग्रंथप्रेमी मंडळीच्या सहकार्याने त्या-त्या भागात अशी विक्री व्हावी म्हणून मी स्वत: प्रयत्न करणार आहे; पण मी मुख्यमंत्री महोदयांकडे फक्त दोन छोट्या मागण्या करणार आहे. या राज्यातील सर्व एसटी बसस्थानकावरील आणि रेल्वेस्थानकावरील वृत्तपत्र आणि पुस्तक विक्री दुकानांची मुद्दाम डोंगरासारखी भाडी वाढवली गेली. मग, मिठाईवाले आणि इतर विक्रेत्यांना चढा भाव घेऊन दुकाने देण्याची व्यवस्था झाली, तरी कृपया विशेष लक्ष घालून ही दुकाने माय मराठीसाठी पुन्हा सुरू करण्यात यावी. तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या व तहसीलदारांच्या कार्यालयासमोर अगदी माफक दरात पुस्तक विक्रीच्या दुकानांना परवानगी देण्यात यावी. जिथे खासगी प्रकाशकांबरोबर शासनाची प्रकाशने आणि साहित्य संस्कृती मंडळ व भाषा विभागाने प्रकाशित केलेले ग्रंथ अग्रहक्काने ठेवण्याची सोय होईल.
बळीराजाची आत्महत्या हे सर्वांचेच अपयश
या भूमीतल्या शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेला हात घालणारा पहिला बंडवाला विद्रोही साहित्यिक म्हणजे महात्मा जोतिबा फुले. ज्यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ नावाची महागाथा 1881 मध्ये लिहिली. शेतकरी नावाच्या दरिद्री नारायणाची कैफियत इंग्रज साहेबाला कळावी म्हणून ते सामान्य कुणब्याच्या पेहरावात ब्रिटिश साहेबाला भेटले असे मानतात. आज नोकरी नाही, म्हणून प्रत्येक खेड्यात शेकडो मुले विनालग्नाची आहेत. बेकारीत पोळणाऱ्या मुलाशी लग्न करण्याऐवजी डोक्यावर अक्षताच न पडलेल्या बऱ्या अशा विचाराने शेकडो मुलींचे विवाह लांबणीवर पडले आहेत, असे विश्वास पाटील म्हणाले.
तुमची आचारसंहिता... आमची विचारसंहिता
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता घोषित झाली आहे. तुमची आचारसंहिता असेल, तर आमची विचारसंहिता असते. तुमच्या आचारसंहितेची मुदत फक्त चार-दोन आठवड्यांपुरती असते, तर साहित्य संमेलनाच्या मंथनातून निघालेल्या विचार शलाकांचा अंमल चार-चार दशके सुद्धा टिकून राहतो, हा या भूमीचा इतिहास आहे, असे विश्वास पाटील म्हणाले.