

सणबूर : वांग-मराठवाडी धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. धरणाची मुख्य कामे पूर्ण झाली आहेत. मुख्य भिंती, बोगद्याचे उर्वरित काम, पिचिंग, शेवटच्या भरावाचे काम सगळं वेगात चालू आहे. त्यामुळे यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरेल असे बोलले जात आहे. धरण पुर्णत्वाकडे जात असताना यंदा या धरणात पुर्ण क्षमतेने पाणी साठा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सह्याद्रीच्या कुशीत डोंगरकड्यांमध्ये उभं राहिलेलं वांग मराठवाडी धरण हे फक्त अभियांत्रिकीचं काम नाही तर हे आहे शेकडो कुटुंबांच्या आयुष्यभराच्या संघर्षाचं प्रतिक आहे. 1997 पासून सुरु झालेलं हे स्वप्न कधी अर्धवट, कधी ठप्प, कधी पुन्हा सुरू. पण लोकांची जिद्द कायम पेटती राहिली. येथील गावे धरणाच्या जलाशयात बुडाली पण त्यांचा आवाज मात्र कधीच दबला नाही. उमरकांचन, मेंढ, घोटील, रेठरेकरवाडी ही पूर्ण गावे जलाशयात गेली.
मराठवाडी, कसणी, निगडे आणि जिंतीची शेती पाण्याखाली गेली. घरं गेली, धरणग्रस्तांच्या नाकातोंडात पाणी गेले पण लोकांचा आवाज कधीच कमी झाला नाही. या साऱ्यात मेंढ आणि उमरकांचन या गावांनी सातत्याने मागणी करत जलाशयाच्या वर सरकून पुनर्वसन मिळवलं, ही त्यांनी मोठी लढाई जिंकली. त्याला साथ मिळाली ती पर्यटन मंत्री ना. शंभूराज देसाई यांची. तसेच इतर गावांची पुनर्वसनेही पूर्ण झाली. परंतु अनेकांची जखम तरीही ताजीच आहे.
निगडे येथील 29 जणांना बामणी (ता. खानापूर) येथे जमीन मिळाली. पण उरलेल्या लोकांची स्पष्ट भूमिका आहे की जमीन नको, रोख रक्कम द्या. कारण अगोदर जिंती येथील 66 जणांना जमीन न देता रोख रक्कम देण्यात आली होती. म्हणूनच आज तेच समसमान न्यायाची मागणी करत आहेत. ही मागणी शासनापुढे प्रलंबित आहे. त्यासाठी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई हे शासनस्तरावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हा जरी पुनर्वसनाचा भाग असला तरी त्याचा पाणीसाठ्यासाठी यात अजिबात अडथळा नाही, हे अधिकाऱ्यांनीही नमूद केले आहे. जिंती व कचणीच्या पुनर्वसनाचा अंतिम निर्णयही रोखीच्या पर्यायावर प्रलंबित आहे. यावरही लवकरच तोडगा निघेल.
धरणाच्या कामाबरोबरच धरणग्रस्तांच्या जखमा भरून काढल्या पाहिजेत, ही भूमिका घेत धरणग्रस्तांच्या बाजूने खंबीरपणे उभं राहणारे नाव म्हणजे ना. शंभूराज देसाई. त्यांनी प्रशासन, विभागीय कार्यालये, अभियंते, सर्व्हे टीम या प्रत्येक स्तरावर स्वतः लक्ष घालून अडथळे दूर केले. धरणस्थळी अनेकदा प्रत्यक्ष येऊन लोकांचे प्रश्न ऐकले आणि महत्वाचे म्हणजे कठीण प्रसंगी धरणावरूनच तात्कालीन मुख्यमंत्र्यांना फोन करून तातडीचे निर्णय करुण घेतले. पुनर्वसन, नुकसान भरपाई, सर्व्हेमधील त्रुटी, प्रस्तावांची ढकलाढकली या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या थेट हस्तक्षेपामुळेच धरणग्रस्तांचा लढा पुढे सरकला. धरण उभं राहायला हवं, पण ज्यांच्या त्यागावर हे धरण उभ राहतय तो माणूस उभा राहणं अधिक महत्त्वाचं हा त्यांचा दृष्टिकोन धरणग्रस्तांच्या मनात खोलवर उतरला आहे.
धरण आता तयार होत आहे आणि लाभक्षेत्रातील लोकांसाठी आशेचा साठा पुर्ण होत आहे. धरणाची मुख्य कामे पूर्ण झाली आहेत. मुख्य भिंती, बोगद्याचे उर्वरित काम, पिचिंग, शेवटच्या भरावाचे काम सगळं वेगात चालू आहे. त्यामुळे यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरेल, पाणीसाठ्यासाठी कोणताही तांत्रिक अडथळा आता शिल्लक नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. संघर्ष जिंकला म्हणूनच हे धरण आज उभं आहे. गावे बुडाली माणसांची घरे, शेती गेली पण त्यांची जिद्द तरली. आज धरण उभं आहे पण अधिक मोठं उभं राहिलंय ते म्हणजे धरणाकाठच्या माणसाचे स्वाभिमानी आयुष्य. आणि म्हणूनच धरण पूर्ण झालं पण धरणग्रस्तांच्या संघर्षाला आजच खरं पाणी मिळालं!