लोणंद : शशिकांत जाधव
खंडाळा तालुक्यातील महत्त्वपूर्ण असणार्या उपअधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयातील प्रमुख अधिकार्यालाच लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. यामुळे भूमि अभिलेख कार्यालयातील यापूर्वी झालेल्या कारनाम्यांची चर्चा होवू लागली आहे. लाच प्रकरणात दोन महिला सापडल्या असला तरी कार्यालयातील पैशासाठी एक ‘पिसाळ’लेला कर्मचारी यातून अलबेल राहिला आहे. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या कारवाईनंतर तरी जनतेचे आर्थिक शोषण थांबणार का? असा सवाल केला जात आहे. खंडाळा येथील प्रशासकीय इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेल्या उपअधीक्षक भूमि अभिलेख या कार्यालयात वर्षभरापासून सर्वसामान्यांची आर्थिक लूट सुरू होती. याबाबत कोणीच आवाज उठवण्यास तयार नव्हते. सर्वच राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारी मूग गिळून गप्प बसले होते. अधिकार्यांवर कोणाचाच वचक नसल्याने अधिकार्यांचा मुजोरपणा व रूबाब वाढला होता. नागरिकांचे पैशाशिवाय व एजंटांशिवाय कामच होत नव्हते. यामुळे सर्वसामान्य हेलपाटे मारून मेटाकुटीला आले.
साध्या साध्या कागदांसाठी अनेक हेलपाटे मारूनही काम केले जात नव्हते. खंडाळ्याच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मात्र एजंटांचे राज्य सुरू असल्याचे चित्र वेळोवेळी पाहायला मिळाले. अनेक एजंट बिनधास्तपणे लोकांची कामे घेऊन येत व लक्ष्मी दर्शन झाल्यानंतरच ती पूर्ण केली जात होती. कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी लक्ष्मीदर्शनाशिवाय आणि टेबलावर वजन ठेवल्याशिवाय कोणत्याही कागदाला, फाईलला हात लावत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. घरातील प्रमुख व्यक्ती मयत झाल्यानंतर वारस नोंदीसाठीही पैशाची मागणी केली जात होती. मेलेल्या मुडद्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार या भूमी अभिलेख कार्यालयात राजरोसपणे सुरू होता. या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे प्रत्येकाचे रेट ठरलेले होते. अधिकारी व कर्मचार्यांसह अनेक एजंटही यामध्ये गब्बर झाले आहेत. ज्या महिलांना पैसे घेताना रंगेहाथ पकडले त्यांची पोस्ट वर्ग 2 ची असली तरी त्यांच्याकडून वर्ग 1 च्या अधिकार्यांचा रूबाब सुरू होता. महिला अधिकार्यांचे वाहन आल्यानंतर त्यांची बॅग घेण्यासाठी एका खासगी व्यक्तीची नेमणूक केल्याच्या चर्चा आहेत. या महिला अधिकारी कोणालाही भीत नसल्याने बिनधास्तपणे कार्यालयात व कार्यालयाच्या बाहेर तडजोडी करत होत्या.
या कार्यालयात भूमिपुत्र असणार्या याच तालुक्यातील पैशासाठी एका ‘पिसाळ’लेल्या एका कर्मचार्याने वेगळाच पायंडा पाडून जनतेची लूट करत आहे. या संबंधिताकडून मॅडमचे वेगळे, माझे वेगळे आणि इतरांचे वेगळे अशी विभागणीच करण्यात आली होती. या पैशाला चटावलेल्या एजंटला इतर अनेक जण साथ देत आहेत. प्रत्येक कामासाठी पैसे हा जणू काही अलिखित नियमच आहे. या सर्व कामात बेरका असणारा ‘पिसाळ’लेला कर्मचारी एजंटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून माया जमा करत आहे. याच्याकडून माया गोळा केली जात असली तरी एसीबीच्या कारवाईत हा ‘पिसाळ’लेला कर्मचारी मात्र नामानिराळा राहिला आहे. एसीबीच्या कारवाईनंतर आता तरी सर्वसामान्यांची लूट थांबणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
खंडाळा येथील उपअधीक्षक भूमी कार्यालयातील महिला अधिकारी या सत्ताधारी पक्षाच्या पुणे येथील आमदाराच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या पत्नी असल्याने त्यांचा मुक्त वावर कार्यालयात होता. यामुळेच लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्या गेल्या.