

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यातील फळबाजारपेठेत देवगड, रत्नागिरीसह कर्नाटक व गुजरातच्या हापूस आंब्याची मोठया प्रमाणावर आवक झाली होती. बदलत्या हवामानामुळे यावर्षी आंबा पिकाचे उत्पादन घटल्याने या आंब्याचे दर मेपर्यंत चढेच राहिले. मात्र, पावसाळी हवामानामुळे खवैय्यांनी पाठ फिरवल्याने मागणी कमी झाली आहे. तसेच स्थानिक केशर हापूस बाजारपेठेत दाखल झाल्याने आंब्याचे दर उतरल्याने खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहे.
दरवर्षी जिल्ह्यात कोकणातून येणार्या हापूस आंब्याला चांगली मागणी असते. गुढीपाडव्यापासून आमरसाची गोडी चाखली जाते. यावर्षीदेखील फळबाजारात रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी व गजराती हापूसची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. अक्षय तृतीयेनंतरही हापूस आंबा 500 ते 600 रुपये डझनने विकले जात होते. मात्र, मे महिन्याच्या अखेरीपासून स्थानिक पातळीवर पिकवला जाणारा केशर हापूसचा हंगाम सुरु झाला. तसेच पायरी, रायवळ, तोतापुरी, तसेच देशी वाणाचे आंबे फळ मार्केटमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आंब्यांचे दर घसरले आहेत. त्यामुळे आंब्यांची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहे. मात्र पावसामुळे आंबा खाण्याची लज्जत कमी झाल्याने खवैय्यांकडून आंबा खरेदीकडे पाठ फिरवली जात आहे.
आंबा हे उन्हाळी हंगामातील फळ असल्याने तेव्हाच त्याची चवही चांगली लागते. पावसात भिजल्याने आंब्याची गुणवत्ता कमी होवून पिकलेल्या आंब्यात आळ्या पडणे, सडणे आदि प्रमाण अधिक असते. यावर्षी मे महिन्याच्या मध्यावरच पावसाने झोडपल्याने आंब्याची गोडी कमी झाली आहे. दमट हवामानात आजारपण वाढत असल्याने आरोग्याच्या काळजीपोटी आंबा खाण्याचे प्रमाण कमी आहे. परिणामी आंब्याला मागणी कमी झाली आहे.