Hyena Conservation : शिकारी, नैसर्गिक सफाई करणार्‍या माणदेशी तरसाचे संवर्धन

जागतिक मान्‍यतेने किरकसाल परिसरातील उपक्रमाला मिळणार गती
Hyena Conservation
Hyena Conservation
Published on
Updated on

सातारा : सर्वोच्च शिकारी, कचर्‍याची नैसर्गिक विल्हेवाट लावण्‍यासह शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रणात महत्त्‍वाची भूमिका पार पाडणार्‍या तरसाच्‍या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात राबवल्या जाणाऱ्या संवर्धन उपक्रमाची आंतरराष्‍ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. या उपक्रमाला जागतिक मान्यतेने आता माणदेशाला नवी ओळख मिळून परिसरातील वन्यजीव संवर्धनाला गती मिळणार आहे.

महाराष्ट्रातील युवा वन्यजीव संवर्धक चिन्मय सावंत यांची इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरच्या (आययूसीएन) तरस विशेष गटासाठी सदस्य म्हणून (एसएससी) नियुक्ती झाली आहे. माणदेशातील पट्टेरी तरस व खुल्या नैसर्गिंक परिसंस्थांच्या संवर्धनासाठी अनेक वर्षांपासून केलेल्या कार्याची ही जागतिक पावती मानली जात आहे.

सावंत यांनी खुल्या नैसर्गिक परिसंस्थांत किरकसाल ग्रामस्थ आणि जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या मदतीने संवर्धनाचे प्रभावी मॉडेल विकसित केले. यात लोकसहभागातून माळरानावरील ६०६ वन्यजीव व वनस्पती प्रजातीचे दस्तऐवजीकरण करण्यात आले. तसेच खुल्या नैसर्गिक परिसंस्थांचे महत्त्व अधोरेखित करताना वन्यजीव व स्थानिक समाज यांच्यातील सहअस्तित्व मजबुतीसाठी प्रयत्न केले.

या कार्याची दखल आययूसीएन एसएसी तरस स्पेशालिस्ट ग्रुपने त्यांना आयोग सदस्य म्हणून निवडले. यामुळे भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केवळ दोघांपैकी एक सदस्‍य म्हणून सावंत यांना १३ देशांतील २० संशोधक व संवर्धन तज्‍ज्ञांसोबत कार्य करण्याची संधी मिळणार आहे. या माध्यमातून जगभरातील तरस संवर्धन, संशोधन, वैज्ञानिक माहितीची देवाणघेवाण व मानव वन्यजीव सहअस्तित्व उपक्रमांना बळकटी दिली जाईल.

तरसाची गणना करणारे राज्‍यातील पहिले गाव

दुष्काळी माणदेशाची ओळख आता केवळ टंचाईग्रस्त भाग म्हणून नव्हे, तर जैवविविधतेच्या संवर्धनासाठीही होऊ लागली आहे. वाघ व बिबट्यांच्या धर्तीवर तरसांची गणना करणारे महाराष्ट्रातील पहिले गाव म्हणून तालुक्‍यातील किरकसाल गावाने विशेष ओळख निर्माण केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news