Managanga river flood : पाणी वाढत होते... तसा मृत्यू समोर दिसत होता...

जीव मुठीत धरुन जाधव कुटुंबियांनी आख्खी रात्र काढली जागून
Managanga river flood
माणगंगेचा महापूर घराच्या उंबर्‍यापर्यंत पोहोचला तेव्हा जाधव कुटुंबियांच्या काळजाचा थरकाप उडाला.pudhari photo
Published on
Updated on
शिखर शिंगणापूर : सचिन बडवे

दिवसभर पावसाचा हाहाकार सुरूच होता, माणगंगेचा प्रवाह वेगाने वाढत होता. सायंकाळी 6 नंतर अचानक नदीपात्रातून पाणी बाहेर पडायला सुरुवात झाली. रात्री 9 च्या सुमारास माणगंगेने रौद्ररूप धारण केलं. मात्र रात्रीच्या वेळी लहान लेकरं, गाईगुरे, शेळ्यामेंढ्या घेऊन कुठं जायचं. नदीचे पाणी वेगाने वस्तीकडे शिरत होतं. जसा जसा पुराचा जोर वाढत होता, तसा मृत्यू समोर दिसत होता. देवापूरच्या जाधववस्तीतील 40 हून अधिक लोकांनी जीव मुठीत धरून कशीबशी रात्र जागून काढली.

माण तालुक्याच्या इतिहासात यावर्षीच्या मे महिन्यात अवकाळी पावसाने कहर केला. रविवारी दिवसभर संपूर्ण तालुक्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. दुष्काळी माणचे ओसाड, उजाड माळरान जलमय झाले. आंधळी धरण तसेच ओढे, नाल्यातून माणगंगेत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढत होती. त्यामुळे माणगंगा दुथडी भरून वाहत होती. तालुक्यातील देवापूर गावानजीक माणगंगेचे पाणी राजेवाडी तलावात जाऊन मिळते. देवापूर गावाच्या हद्दीत महादेव मंदिराच्यानजिक नदीच्या परिसरात राजेवाडी तलावपात्रात जाधववस्तीवर शहाजी गणू जाधव, महादेव गणू जाधव, उमाजी गणू जाधव, भीमराव गणू जाधव, शिवाजी खाशाबा मंडले, विश्वास खंडू जाधव, श्रीमंत चव्हाण, कैलास चव्हाण या आठ कुटुंबातील लहानमोठे साधारण 46 लोक वास्तव्यास असल्याचे स्थानिक रहिवाशी अक्षय जाधव यांनी सांगितले.

रविवारी रात्री झालेल्या धुवाँधार पावसाने माणगंगेची पाणीपातळी अचानक वाढल्याने सर्वच कुटुंबीयांनी भीतीच्या छायेखाली रात्र काढली. आमच्या हयातीत मे महिन्यात एवढा पाऊस कधी बघितला नाही. रविवारी दुपारपर्यंत माणगंगा संथ वाहत होती. मात्र पावसाचा जोर वाढल्याने दुपारी पाण्याचा प्रवाह वाढला. सायंकाळी 6 च्या सुमारास नदीपात्राच्या बाहेर पाणी पडायला सुरुवात झाल्याने आमची धास्ती वाढली. मोबाईलवरून पाऊस आणि नदीच्या पाण्याची माहिती मिळत होती. देवापूरचे सरपंच शहाजी बाबर यांनी फोन करून आमची चौकशी केली. पण पाणी घरापर्यंत येईल याची कल्पनाही नव्हती. रात्री 9 नंतर मात्र पाण्याचा प्रवाह वाढला, नदीचे पाणी वस्तीकडे सरकू लागलं. बघता बघता पुराचे पाणी घराच्या अंगणात आलं. आता मात्र भीतीने गाळण उडाली. एवढ्या अंधार्‍या रात्री 15-16 लहान मुलं, 25-30 जनावरे, 40 मेंढ्या घेऊन जायचं कुठं असा प्रश्न पडला. आम्ही गडी माणसांनी लहान लेकरं,बाया माणसांना धीर देत रात्र इथच जागून काढायचं ठरवलं. त्यात तीन दिवसांपासून लाईट नव्हती.

पाण्याचा जोराचा आवाज,सगळीकडे अंधार, पाण्यातून फिरणारे साप यामुळे अंगाचा थरकाप होत होता. जसा जसा पाण्याचा वेढा वाढत होता, तसा तसा मृत्यू समोर दिसत होता. जाधववस्तीतील 40-45 जणांनी गोडतेलाचे दिवे लावून पुराची भयानक अंधारी रात्र जीव मुठीत धरून जागून काढली. सुदैवाने रात्री पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने घरात पाणी शिरले नाही. सोमवारी सकाळपासून पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. अक्षय जाधव यांच्या थरारक अनुभवाने अंगावर काटा उभा रहात होता.

तर राजेवाडी तलावात वाहून गेलो असतो...

रविवारी माण तालुक्यात झालेल्या अभूतपूर्व पावसाने माणगंगेला पूर आला. नदीच्या काठावर राजेवाडी तलाव पात्रात असलेल्या जाधववस्तीच्या परिसरात पुराचे पाणी शिरल्याने जाधव कुटुंबीयांनी अख्खी रात्र जीव मुठीत धरून जागून काढली. सुदैवाने रात्री पुराचे पाणी कमी झाले. नाहीतर पुराचे पाणी वाढले असते तर आम्ही सर्वजण राजेवाडी तलावात वाहून गेलो असतो, अशी भीती अक्षय जाधव यांनी ’पुढारी’ शी बोलताना व्यक्त केली. मात्र रविवारी सायंकाळी पाणीपातळी वाढल्याचे निदर्शनास येताच जाधव कुटुंबीयांनी प्रशासन यंत्रणेशी संपर्क साधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे गरजेचे होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news