

दहिवडी : जगातील सर्वात बुटकी पाळीव म्हैस म्हणून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मलवडी (ता. माण) येथील राधा या म्हशीची नोंद झाली. जागतिक पातळीवर झळकल्याबद्दल राधा व तिच्या पालकांचा कौतुक सोहळा मलवडीत रंगला. या सोहळ्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी राधाचे पशुपालक यांचा सन्मान केला.
मलवडी येथील शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या या ‘राधा’चा सध्या सर्वत्र बोलबाला सुरू आहे. निसर्गतः वेगळेपण घेऊन जन्माला आलेल्या राधा या म्हशीचा बोराटे कुटुंबीयांनी योग्य प्रकारे सांभाळ केला. त्याच राधाने जगामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मलवडीकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट ठरली आहे. राधाला पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे व त्यांचे चिरंजीव अनिकेत बोराटे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सन्मान पत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन काळे, भाजपाचे माजी सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर, परकंदी गावचे माजी सरपंच बाळासाहेब कदम, मलवडी गावचे माजी सरपंच दादासाहेब जगदाळे, उद्योजक दुर्योधन सस्ते, सोमनाथ शेटे, दशरथ बोराटे, गणेश जगदाळे, दादा जगदाळे, बाळासाहेब मगर, उमेश मगर व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, राधाची मलवडी गावातून हलगीच्या कडकडाटात व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.