ढेबेवाडी : मागील काही वर्षापासून कराड आगाराच्या एसटी प्रवासावेळी बंद पडण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. मार्गावरच एसटी बंद पडणे, प्रवाशांना दुसर्या एसटीची प्रतिक्षा करत तिष्ठत रहावे लागणे असे प्रकार आता नित्याचाच झाला आहे. त्यामुळेच प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन फिरणारी एसटी प्रवाशांच्या गैरसोईसाठीच आहे की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. कराड - ढेबेवाडी मार्गावर गुरूवारी मानेगाव हद्दीत कराड आगाराची एसटी अशाच प्रकारे बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळेच कराड आगारातील सुस्थितीत नसणार्या एसटी कशासाठी गावोगावी पाठविल्या जातात ? असा संतप्त प्रश्न निर्माण होत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील कराड आगार उत्पन्नात आघाडीवर आहे. कराड आगारात जास्त उत्पन्न मिळवून देणारा रूट म्हणून ढेबेवाडी मार्गाची ओळख आहे आणि हे कुणीही नकारू शकत नाही. मात्र याच रूटवर एसटी बंद पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गुरूवारी कराड - ढेबेवाडी मार्गावर साई पेट्रोल पंप परिसरात माने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर तांत्रिक बिघाडामुळे बस बंद पडली होती. त्यामुळे एसटीमधील सर्वांना खाली उतरविण्यात आले होते. त्यानंतर दुसर्या एसटीची प्रतिक्षा करावी लागली.
वेळेत दुसरी एसटी न आल्याने काहींना वडापने कराडकडे जावे लागले. तर उर्वरित लोक एसटीची प्रतिक्षा करून अक्षरशः वैतागलेले होते. ढेबेवाडी विभागात कराडला विविध कामासाठी येणार्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्याच पद्धतीने पाटण - ढेबेवाडी प्रवास करणार्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. पण तुलनेत रस्त्यावर बसेस बंद पडण्यात कराड आगार आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे प्रमाण कमी करण्यात अद्याप तरी कराड आगाराच्या व्यवस्थापनाला यश आल्याचे दिसत नाही. बंद पडलेली एसटी व खाली उतरून दुसर्या बसची प्रतिक्षा करणारे प्रवाशी किंवा एसटीचा नाद सोडून वडापने पुढचा प्रवास करणारे प्रवाशी हे चित्र ढेबेवाडी विभागात अधूनमधून पहावयास मिळते. त्यामुळेच कराड आगारासह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कराड आगारास केव्हा सुबुद्धी येणार ? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.

