Makrand Patil | कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : ना. मकरंद पाटील

पाचगणी-महाबळेश्वर मुख्य रस्त्याची केली पाहणी
Makrand Patil | कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : ना. मकरंद पाटील
Published on
Updated on

पाचगणी : पाचगणी-महाबळेश्वर मुख्य रस्त्यावरील सुरु असलेल्या विकासकामांची राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन संबंधित अधिकारी व ठेकेदारांना कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. यावेळी रस्त्यावरील काँक्रेटीकरण, डांबरीकरण तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेत कामात कोणतीही दिरंगाई अथवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

पाचगणी ते महाबळेश्वर हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून दररोज हजारो पर्यटक व स्थानिक नागरिक या मार्गाचा वापर करतात. ना. मकरंद पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह रस्त्याची पाहणी केली. यावेळी कॉन्ट्रॅक्टर कपाडिया, इंजिनीयर सावजी तसेच रेड्डी उपस्थित होते. मंत्र्यांनी रस्त्याच्या कामांची माहिती घेत काँक्रेट झालेल्या रस्त्याच्या बाजूला असलेली साईड पट्टी तातडीने भरुन घेण्याच्या सूचना दिल्या. साईड पट्टी न भरल्यामुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

पाहणीदरम्यान ना. मकरंद पाटील यांनी यापूर्वी झालेल्या दिरंगाईबाबत ठेकेदारांना स्पष्ट शब्दांत जाब विचारला. रखडलेल्या कामांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. यापुढे कामात कोणताही विलंब अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी कठोर सूचना त्यांनी संबंधित ठेकेदारांना दिली. कामांचा वेग वाढवून निर्धारित मुदतीत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले. काम सुरु असताना नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कामात निष्काळजीपणा अथवा विलंब आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ना. मकरंद पाटील यांनी दिला.

यावेळी जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे, जिल्हा समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र भिलारे, सपो निरीक्षक दिलीप पवार, नगरसेवक राजेंद्र पारठे, शशिकांत भिलारे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news