

खंडाळा : ज्यांनी या तालुक्यातील संस्था बंद पाडल्या भ्रष्टाचार केला. तीच मंडळी आज मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. कारखाना बंद पाडणारे एका विजयाने हुरळले आहेत, असे टिकास्त्र राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंदआबा पाटील यांनी माजी आमदार मदनदादांवर सोडले. दरम्यान, त्या मंत्र्यांचा इथे येवून नारळ फोडायचा काय संबंध? असा घणाघातही ना. मकरंद पाटील यांनी ना. जयकुमार गोरेंचा नामोल्लेख टाळून केला.
पारगाव येथील खेड गटातील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील यांची उपस्थिती होती. ना. मकरंद पाटील म्हणाले, विरोधकांनी संस्था बंद पाडायच्या आणि राष्ट्रवादीने त्या ऊर्जित अवस्थेत आणायच्या. मात्र, एका विजयाने हुरळून जात तेच गुलाल काय उधळतात. काय काय करतात. अशा लोकांचे आश्चर्य वाटते. आपण केलेल्या कामांचे श्रेय विरोधक घेत फिरत आहेत. निर्लज्जा सारखे मतांचा जोगवा मागतात. यापेक्षा राजकारणात कोणतीही वाईट गोष्ट असू शकत नाही. पक्ष कोणालाही उमेदवारी देवो. घेतलेल्या निर्णया सोबत कार्यकर्त्यांनी एक निष्ठ रहावे. आपण गावागावात कोट्यवधी रुपयांची कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. कामे आपण करतो. मात्र नारळ दुसरीच फोडतात. त्या मंत्र्यांचा जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर होणाऱ्या कामात संबंध काय? असा सवालही त्यांनी केला.
ना. मकरंद पाटील म्हणाले, आपल्या कामाचे श्रेय आपल्याला घेता येत नसेल तर तुम्ही कार्यकर्ते काय कामाचे? विरोधकांचे काम भुलथापा देणे हेच आहे. आठ-नऊ वर्षात विरोधकांच्या कतृत्वाने निरादेव-घरच्या कॅनॉलने साधा हायवे पास केला नव्हता. आज 65 किलोमीटरपर्यंत काम पूर्ण झाले आहे. त्यापुढे ही काम सुरू आहे. तालुक्यातील पाण्यापासून वंचित गावांना पाणी देण्याचे नियोजन केले आहे. समोरचा पक्ष कोणाला उमेदवारी देईल. त्याप्रमाणे आपणाला उमेदवार द्यावा लागेल, असेही ते म्हणाले. यावेळी मनोज पवार, गणेश धायगुडे, नितिन भरगुडे पाटील, दत्तानाना ढमाळ, शामराव गाढवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.