

पाचगणी : पाचगणी हे एक प्रमुख पर्यटनस्थळ असून येथील वाढत्या लोकसंख्येची आणि पर्यटकांची गरज लक्षात घेता पायाभूत सुविधांचा विकास अत्यावश्यक आहे. नवीन मुख्याधिकारी पाचगणीच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशा सूचना मदत व पुनर्वसनमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केल्या.
पाचगणीचे नूतन मुख्याधिकारी पंडित पाटील यांचा ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र बिरामणे, प्रकाश गोळे, रुपेश बगाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ना. पाटील पुढे म्हणाले, पाचगणीच्या सौंदर्याला पर्यटक नेहमीच आकर्षित होतात. मात्र स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सेवा आणि रस्ते आदी मूलभूत सुविधांची आवश्यकता वाढली आहे. नवीन मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या रूपाने शहराला एक अभ्यासू व कार्यक्षम अधिकारी मिळाला आहे. त्यांच्याकडून शहरात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे. कोरोना काळापासून पाचगणी नगरपालिका प्रशासकीय राजवटीखाली काम करत आहे. त्यामुळे पाचगणी परिसरातील विकासकामांना खीळ बसली आहे.
पाचगणीचे पर्यटनदृष्ट्या असलेले महत्त्व मी जाणतो. येथील स्वच्छता, शिस्तबद्ध वाहनव्यवस्था आणि नागरी सेवा यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध राहील. नागरिकांचा सहभाग आणि सहकार्य महत्त्वाचे असल्याचे पंडित पाटील यांनी सांगितले.