Wai ZP Election : वाई तालुक्यात मकरंदआबांचा करिष्मा

भुईंज गटात मदनदादांच्या भाजपचा झेंडा : पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता
Wai ZP Election
वाई तालुक्यात मकरंदआबांचा करिष्मा
Published on
Updated on

वाई : वाई तालुक्यात अपेक्षेप्रमाणे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. तालुक्यात सर्वत्र राष्ट्रवादी सुसाट असताना माजी आमदार मदनदादा भोसले यांनी भुईंजमध्ये त्याला ब्रेक लावला. भुईंजच्या टस्सल लढाईत भाजपने बाजी मारली. यामुळे तालुक्यातील 4 पैकी 3 गटावर राष्ट्रवादी आणि एका गटावर भाजपने विजय मिळवला. यामुळे मदनदादांनी मकरंदआबांचा विजयाचा वारू रोखला असला तरी तालुक्यात राष्ट्रवादीचाच बोलबाला राहिला आहे. पंचायत समिती राष्ट्रवादीकडे आली असली तरी गतवेळच्या तुलनेत एक जागा कमी झाली. पंचायत समितीत राष्ट्रवादी 5 व भाजप 3 असे बलाबल राहिले. भुईंजमध्ये किसनवीरचे व्हा. चेअरमन प्रमोद शिंदे यांचा पराभव मकरंदआबांच्या जिव्हारी लागला असून जोमाने काम करण्याची राष्ट्रवादीला गरज आहे. तर मदनदादांनी ताकत लावल्याने पुन्हा आपला गड ताब्यात घेतला.

वाई तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 4 गट व 8 गणांसाठी प्रशासकीय इमारत येथे 16 टेबलवर मतमोजणीला सुरूवात झाली. अंतिम निकालानंतर तालुक्यात राष्ट्रवादीकडे यशवंतनगर, बावधन आणि ओझर्डे हे गट राहिले. तर भुईंज गटावर भाजपने विजय मिळवला. याचबरोबर अभेपूरी, बावधन, केंजळ, ओझर्डे आणि पाचवड या गणांवर राष्ट्रवादी तर भुईंज, शेंदूरजणे आणि यशवंतनगर या गणांवर भाजपने विजय मिळवला. यामुळे राष्ट्रवादीची पंचायत समितीवर सत्ता आली आहे.

यशवंतनगर गटात राष्ट्रवादीचे दिनकर उर्फ बापूसाहेब शिंदे विरूध्द रोहित वाडकर यांच्यात टक्कर झाली. या लढतीत बापूसाहेब यांनी वाडकर यांचा 1935 मतांनी विजय मिळवला. या गटात अनुभव विरुद्ध तरुणाई अशी लढत ठरली. ऐनवेळी बापूसाहेब शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला हे पक्षाच्या पथ्थ्यावर पडले. बापूसाहेब यांचा जनसंपर्क व राष्ट्रवादीची विकासकामे या जोरावर राष्ट्रवादीला गटात यश मिळाले. तर वाडकर यांचा जनसंपर्क कमी पडला, तसेच प्रचार यंत्रणा राबवण्यातही ते कमी पडले. यामुळेच ना. गोरे यांची सभा झाल्यानंतरही भाजपला पराभवाचे तोंड पहावे लागले.

बावधन गटात तालुक्यातील हाय व्होल्टेज सामना झाला. राष्ट्रवादीच्या ऋतुजा शिंदे यांनी भाजपच्या ॲड. दिप्ती पिसाळ यांचा तब्बल 3 हजार 806 मतांनी पराभव केला. या गटात दोन्ही पक्षांनी आयात उमेदवार दिले होते. भाजपकडून माजी जि.प. अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ यांच्या कन्या ॲड. दिप्ती पिसाळ विरूध्द युवा नेते विराज शिंदे यांच्या पत्नी ऋतुजा शिंदे यांच्यात सामना झाला. या गटात बावधनच्या अस्मितेवर घाला घातला जात असल्याची भावनिक हाक भाजपने दिली. मात्र, राष्ट्रवादीने त्याला गटातील विकासकामे आणि घराणेशाहीवर हल्लाबोल करत प्रचार केला. दोन्ही पक्षांकडून टोकाचा प्रचार करण्यात आला. मात्र, ऋतुजा शिंदे यांना राष्ट्रवादीची मिळालेली भक्कम साथ, त्यांचा पंचायत समिती सदस्य असलेला अनुभव आणि पती विराज व सासरे रतनसिंह यांचा जनसंपर्क या जोरावर त्यांनी विजयश्री खेचून आणली. तर पिसाळ कुटुंबाने निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश करणे जनतेला रूचले नाही. याचबरोबर दिप्ती पिसाळ या परक्या उमेदवार असल्याचा प्रचार करण्यात आल्याने जयकुमार गोरे यांनी ताकद लावूनही भाजपला आपटी खावी लागली.

ओझर्डे गटात राष्ट्रवादीच्या वृषाली चव्हाण यांनी भाजपच्या दिपाली जाधव यांचा तब्बल 8 हजार 522 मतांनी विजय मिळवला. या गटात वृषाली चव्हाण यांनी सुरूवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र, दिपाली जाधव या लोकांपर्यंत पोहचण्यात कमी पडल्या. त्यातच अल्पना यादव यांना माघार घेतल्याने त्यांच्या गटाची नाराजी ओढावल्याने जाधव यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपमधील अंतर्गत नाराजीचा फटकाच त्यांना बसला. त्यामुळे तालुक्यातच नव्हे तर वाई मतदारसंघात वृषाली चव्हाण यांनी सर्वाधिक मताधिक्क्याने विजय मिळवला.

अभेपूरी गणात राष्ट्रवादीचे विक्रांत डोंगरे यांनी भाजपच्या अशोक मांढरे यांचा 2709 मतांनी पराभव केला. या गटात डोंगरे यांना भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी आव्हान दिले होते. मात्र, यामध्ये डोंगरेंची बाजू वरचढ ठरली. यशवंतनगर गणात रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड यांचे पुत्र स्वप्निल गायकवाड यांनी उलटफेर करत विजय मिळवला. भाजपचे स्वप्निल गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे संजय कांबळे यांचा 2 हजार 441 मतांनी पराभव केला. गेल्या काही वर्षांपासून त्यांचे असलेले काम, प्रचंड लोकसंपर्क आणि क्रशर आंदोलनातील सक्रीय सहभाग यामुळे गायकवाड यांचा विजय सुकर झाला. शेंदूरजणे गणात राष्ट्रवादीच्या वर्षा जगताप यांनी भाजपच्या अनिता कोंढाळकर यांचा तब्बल 5 हजार 441 मतांनी धूळ चारली. या गणात जगताप यांचा असलेला संपर्क कामी आला. तर कोंढाळकर यांनी ऐनवेळी पक्ष बदलल्याचा त्यांना फटका बसला.

बावधन गटामध्ये राष्ट्रवादीने विजय मिळवला असला तरी गणात मात्र भाजपने बाजी मारली. या ठिकाणी भाजपचे सचिन भोसले यांनी राष्ट्रवादीचे विक्रम पिसाळ यांचा अवघ्या 331 मतांनी पराभव केला. तर याच गणात काँग्रेसचे काशिनाथ पिसाळ यांनीही 321 मते घेतली. या गणात दिपक ननावरे यांनी घेतलेली मेहनत भाजपच्या विजयाला कारणीभूत ठरली. केंजळ गणात झालेल्या एकतर्फी लढाईत शैलेश सपकाळ यांनी भाजपचे दीपक पवार यांचा पराभव केला. सपकाळ यांनी पवार यांचा 2 हजार 573 मतांनी पराभव केला. ओझर्डे गणामध्ये राष्ट्रवादीच्या हर्षदा फरांदे यांनी भाजपच्या अंकिता फरांदे यांचा 4 हजार 225 मतांनी पराभव केला.

भुईंज गटावर भाजपने विजय मिळाल्याचा फायदा भुईंज गणात मदनदादा भोसले यांच्या कन्या सुरभि भोसले यांचा विजय सोपा झाला. वडीलांनी केलेले काम आणि भाजपची फौज या बळावर सुरभि यांनी राष्ट्रवादीच्या शितल वारागडे यांच्यावर 894 मतांनी विजय मिळवला. मात्र, पाचवड गणात राष्ट्रवादीच्या राणी पवार यांनी वनिता शिंदे यांचा 1550 मतांनी पराभव केला. यामुळे राष्ट्रवादीने गणात विजय मिळवत गटात झालेल्या जखमेवर फुंकर मारण्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news