

सातारा : वाई विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला प्रत्येक निवडणुकीत उच्चांकी मतांनी निवडून दिले आहे. मी दोन-तीन हजार मतांनी निवडून येत नाही, अशा शब्दांत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते मकरंद पाटील यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर पलटवार केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पाऊस नुकसानीची आढावा बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी आ. सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील उपस्थित होते. यावेळी मंत्री मकरंद पाटील यांना पत्रकारांनी छेडले.
माझ्या माण-खटावला दुष्काळी म्हणण्याचे कुणी हिंमत करणार नाही, असे ग्रामविकास मंत्री म्हणत असताना तुम्ही माण-खटावचा उल्लेख ‘दुष्काळी’ असा केला. हे राजकीय उट्टे काढण्याचा किंवा खपली काढण्याचा प्रकार आहे का, असे विचारले असता ना. मकरंद पाटील यांनी मी पूर्वाश्रमीचे असे वाक्य वापरले असल्याचे सांगितले.
मंत्री जयकुमार गोरे यांनी वाईमध्ये कार्यक्रम घेतल्यानंतर माणमध्ये तुम्ही लक्ष घालायला सुरुवात केली आहे, असा आरोप तुमच्यावर होत आहे. खंडाळ्याला चांगले नेतृत्व मिळालं असतं तर आणखी चांगला विकास झाला असता, असे वक्तव्यही त्यांनी केलं होतं, याबाबत विचारले असता मंत्री ना. मकरंद पाटील म्हणाले, प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. ते त्यांचा पक्ष वाढवत असून मी माझा पक्ष वाढवत आहे. मतदार मला प्रत्येकवेळी उच्चांकी मतदान करतात हे त्यांना माहीत नसेल. मी 2-3 हजार मतांनी कधी निवडून आलो नाही, कायम उच्चांकी मतांनी निवडून आलो आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.