

सातारा : घरकाम करणार्या महिलेनेच घरातील सुमारे 10.5 तोळे वजनाच्या दागिन्यावर डल्ला मारल्याचे समोर आले. चोरीची घटना मे महिन्यातील असून, पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून संबंधित महिलेला अटक केली. सीमा कोकरे (रा. सातारा) असे तिचे नाव आहे. तिच्याकडून 9 लाख 60 हजारांचे सोने हस्तगत केले. महेंद्र अशोक पवार (वय 35, रा. शाहूपुरी) यांनी फिर्याद दिली आहे.
दि. 17 मे रोजी घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. तपासात घरामध्ये सीमा कोकरे (रा. सातारा) ही महिला सहा महिन्यांपासून घरकामाला घरकाम करण्यास येत असल्याचे समजले. चोरी झाली, त्यादिवशी या घरकामगार महिलेशिवाय दुसरे कोणी आले नसल्याचेही तपासात समोर आले. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता, तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर मात्र तिने चोरी केल्याचे कबूल केले.
या महिलेलकडून चोरीतील 10.5 तोळे वजनाचे 9 लाख 60 हजाराचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार कुमार ढेरे व पोलीस सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे व महिला पोलीस अंमलदार माधुरी शिंदे, कोमल पवार, गायत्री गुरव यांनी कारवाईत सहभाग घेतला.