

दहिवडी : महिमानगड, ता. माण येथील शिवकालीन महिमानगड किल्ला पर्यटन केंद्र व राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी भूमी अभिलेख उपाधीक्षक धनंजय कदम आणि त्यांच्या सहकार्यांनी किल्ल्याची महसुली दस्तऐवजानुसार पाहणी केली.
धनंजय कदम यांच्या मार्गदर्शनाखालील पथक किल्ला पाहणीसाठी आले. त्यामध्ये सहकारी कर्मचारी प्रसाद जाधव, राजेश जाधव, तलाठी अमोल कोकणे, तलाठी सहायक हनुमंत जगदाळे, अमोल एकळ, महिमानगडचे उपसरपंच विजय चव्हाण, लालासाहेब चव्हाण, सुरेश कुचेकर, महिमानगडचे पोलीस पाटील संदीप धडांबे आणि त्यांचे सहकारी होते. तलाठी व मंडल अधिकार्यांनी दिलेल्या महसुली दस्तऐवजानुसार किल्ल्याची सर्वांगीण माहिती घेण्यात आली. किल्ल्याच्या सर्वत्र फेरफटका मारून माहिती संकलित करण्यात आली. शिवकालीन विहिरी व किल्ल्यावरील आणखी घटकांची माहिती घेण्यात आली आहे.
किल्ले महिमानगड राज्यसंरक्षित स्मारक व पर्यटन केंद्र होण्यासाठी अमोल एकळ फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने धनंजय कदम यांची भेट घेतली होती. राज्य शासनाकडून दुर्लक्षित राहिलेल्या ऐतिहासिक शिवकालीन महिमानगड किल्ला पर्यटन केंद्र होण्यासाठी अमोल एकळ फाउंडेशनच्यावतीने पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, या किल्ल्याबाबतचे महसुली दस्तऐवज उपलब्ध करण्याचे पत्र तहसीलदार विकास अहिर यांनी भूमी अभिलेख उपाधीक्षक धनंजय कदम व मंडल अधिकारी विजय जाधव यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर अमोल एकळ फाउंडेशनच्या शिष्टमंडळातील सदस्यांनी संबंधित अधिकार्यांची भेट घेऊन चर्चा केली. या पाठपुराव्यानंतर किल्ले महिमानगड पर्यटन केंद्र होण्यासाठी गती मिळाली आहे.