

सातारा : महिला व युवतींच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने निर्भया हे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, बस स्थानक व गर्दीच्या ठिकाणी दिवसरात्र गस्त घालून टवाळखोरांवर लक्ष ठेवून महिलांवरील अत्याचाराला आळा घालत आहेत. जिल्ह्यातही या निर्भया पथकांकडून दोन वर्षात 68 रोड रोमिओंवर कारवाई करत शिस्तीची चपराक दिली आहे. त्यामुळे महिला व युवतींना दिलासा मिळाला आहे.
महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत व घडल्याच तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तसेच त्या प्रसंगात स्वत:चा बचाव करण्यासाठी मदत, संरक्षासाठी पोलिस प्रशासनाकडून निर्भया पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस दलाच्यावतीने विभागीय कार्यालयांतर्गत 7 निर्भया पथके कार्यरत आहेत. ही निर्भया पथके प्रो ॲक्टीव्ह म्हणजेच तक्रारीऐवजी स्वत:हून दखल घेत कारवाई व रिॲक्टीव्ह म्हणजेच तक्रारींवर आधारित कारवाई अशी दोन्ही प्रकारे काम करतात. जिल्ह्यातील सात निर्भया पथकांद्वारे मागील दोन वर्षात तब्बल 68 रोड रोमिओंवर कारवाई करत सार्वजनिक ठिकाणी छेडछाड व विनयभंगाच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. मोटार वाहन कायद्यांतर्गत 9 हजार 52, तर सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तनाबाबत 39 हजार 161 जाणांवर कारवाई केली आहे. रोडरोमिओंना कायद्याची चपराक देत कारवाईचा चाप लावला आहे.
निर्भया पथकाच्या प्रत्येक टीममध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक किंवा पोलिस उपनिरीक्षक दर्जाची एक महिला अधिकारी, दोन महिला व दोन पुरुष पोलिस हवालदारांचाही समावेश असतो. निर्भया पथकाची टीम खासगी वेशात वावरते. आरोपींवर नियंत्रण ठेवण्यासाठी टीम सोबत स्पाय कॅमेराही असतो. टीमबरोबर स्पाय कॅमेरा, स्मार्ट फोनचा कॅमेरा किंवा छुपा कॅमेऱ्याच्या मदतीने त्यांच्या छेडछाडीच्या संशयास्पद हालचालींचं चित्रीकरण करुन त्या आधारे संशयिताला ताब्यात घेऊन स्थानिक पोलिस स्टेशनला नेवून पुढील कार्यवाही केली जाते. त्यामुळे महिला व मुलींवरील अत्याचारांना आळा बसण्यास मदत होत आहे.
निर्भया पथकामार्फत प्रबोधनासाठी महिला व तरुणींना त्यांच्या सुरक्षितता आणि कायदेशीर हक्कांबाबत जाणीव करुन देणे आणि पुरुषांना त्यांचे कृत्य अपराध असल्याबाबत किंवा त्याचे परिणाम, शिक्षा याचे मार्गदर्शन करण्यात येते. मार्गदर्शन शिबिरे, पोस्टर्स, वेबसाईट, रेडियोवरील महिलांविषयक, तरुणांचे कार्यक्रम, स्टीकर्समार्फत जनजागृती केली जात आहे. महिला व मुलींनीदेखील निडरतेने आपल्याबाबत होणाऱ्या गैरप्रकारांना वाचा फोडण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.