

कोरेगाव : फुलशेती उद्योगाचे रक्षण करण्यासाठी आ. महेश शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात आवाज उठवला. प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. जागतिक पातळीवरील फ्लोरल डेली या नियतकालिकेने याची दखल घेतली आहे. प्रकाशनाच्या पहिल्या पानावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. आ. महेश शिंदे यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण मागणीची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली असल्याने आता प्लास्टिक फुलांवरील बंदीच्या विषयाला आता मोठी ताकद मिळाली आहे.
परदेशात बंदी घातलेली कृत्रिम फुले भारतात विशेष करून महाराष्ट्रात सर्वत्र दिसून येतात. या कृत्रिम फुलांचा वापर किती भयानक आहे, याचे भीषण वास्तव लक्षात घेऊन आ. महेश शिंदे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न प्राधान्याने उपस्थित केला. फ्लोरल डेली या नियतकालिकेने याविषयी प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये आ. महेश शिंदे यांनी केलेले मागणी विस्तृतपणे नमूद केली आहे. कृत्रिम फुलांमध्ये टायटॅनियम डायऑक्साइडसारखे विषारी पदार्थ असतात. जे आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करतात. काही युरोपीय देशांनी आधीच प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घातली आहे. आता आपणही तेच करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सातारा जिल्ह्यातील फुल शेतीवर आलेल्या संकटाचा उल्लेख करत आ. महेश शिंदे यांनी एकेकाळी भरभराटीला आलेला फुलशेती उद्योग जवळजवळ कोसळला असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
फुलशेतीसाठी समर्पित 1300 ग्रीनहाऊस संपूर्ण जिल्ह्यात होते. आज 50 पेक्षा कमी शिल्लक राहिले आहेत, असे त्यांनी उघड केले. एकेकाळी 375 ग्रीनहाऊस असलेल्या वर्णे गावातच फुलांची निर्मिती आणि व्यापार आता नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहे, असेही त्यांनी सांगितले. आ. महेश शिंदे यांच्या या विषयावर राज्य सरकार गंभीर असून लवकरच पर्यावरण मंत्री यांच्याशी चर्चा करून बैठक घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल. त्या माध्यमातून फूलशेती करणार्या शेतकर्यांना देखील दिलासा दिला जाईल, अशी ग्वाही फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिली आहे.