Karad News: उड्डाणपुलाच्या भरावाचे काम कधी बंद, कधी सुरू

ठेकेदारांचा मनमानीपणा सुरूच; काम न झाल्यास पुण्याकडे जाणे अडचणीचे
Karad News
Karad News: उड्डाणपुलाच्या भरावाचे काम कधी बंद, कधी सुरूPudhari
Published on
Updated on
चंद्रजीत पाटील

कराड : पुणे - बंगळूर आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम कासवगतीपेक्षा संथ गतीने सुरू आहे. कोल्हापूर नाक्यावरील नव्याने होणाऱ्या उड्डाणपुलाच्या ॲप्रोच मार्गाचे म्हणजेच भरावाचे काम वर्षभरानंतरही रखडले असून हे काम कधी बंद तर कधी सुरू असते.

सद्य:स्थिती पाहता ठेकेदार कंपनीच्या लहरीपणामुळे काम रखडले असून आता पावसाळ्यापूर्वी उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. त्यामुळे पावसाळ्यात कोल्हापूरकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसह कराड तालुक्यातील स्थानिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ठेकेदार कंपनीच्या या मनमानीला चाप कोण व कधी लावणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

जानेवारी 2023 मध्ये पुणे - बंगळूर महामार्ग सहापदरीकरणाच्या कामास सुरूवात झाली होती. त्यानंतर दोन वर्षात म्हणजेच जानेवारी 2025 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आता फेब्रुवारी 2026 उजाडला असला तरी हे काम अपूर्णच आहे. अपूर्ण कामामुळे महामार्गाला मृत्यूचा सापळा म्हणूनच पाहिले जात असून एकट्या कराड तालुक्यात प्रत्येक महिन्याला भीषण अपघात होऊन सरासरी दोन व्यक्तींना प्राणास मुकावे लागले आहे.

मात्र असूनही ठेकेदार कंपनी अदानी आणि सबठेकेदार कंपनी डी. पी. जैनकडून महामार्गाच्या कामात चालढकल सुरूच आहे. तालुक्यात वाठार, पाचवड फाटा, आटके, नांदलापूर, खोडशी, गोटे यासह पूर्वी उड्डाण पूल असणाऱ्या आणि महामार्गाखालून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्याचे काम सुरूच असल्याचे पहावयास मिळते. कराडजवळ नव्याने होणाऱ्या उड्डाण पुलास जोडणारा नांदलापूर बाजूचा रस्ता अपूर्ण असला तरी सुमारे 70 ते 80 टक्के काम पूर्ण झाल्याचे पहावयास मिळते. मात्र कराडजवळ उड्डाण पुलाच्या भरावाचे काम अद्यापही गतीने सुरूच होऊ शकलेले नाही. मागील दोन महिन्यापासून सातत्याने उड्डाण पुलालगत भराव टाकण्याचे आणि पुलाला जोडणाऱ्या ॲप्रोच रस्त्याचे काम कधी बंद तर कधी सुरू असते. हे काम बंद जास्त काळ असते आणि त्यामुळेच पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे.

पावसाळ्यापूर्वी कराडजवळील उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू न झाल्यास मोठ्या प्रमाणावर कराडजवळ वाहतूक कोंडी होणार असून याचा सर्वाधिक फटका कोल्हापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या वाहन चालकांसह प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कराड तालुक्यातील नागरिकांना याची फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. दोन दिवस उड्डाण पुलालगत भराव टाकण्याचे सुरू असणारे काम गुरूवारी दिवसभर बंदच होते.

कराडप्रमाणेच तालुक्यात अशीच परिस्थिती असल्याने पावसाळ्यात वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागणार हे स्पष्ट आहे. अजूनही पावसाळा सुरू होण्यास जवळपास तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळेच कराडच्या उड्डाण पुलासह भराव आणि पुलाला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम गतीने करावे यासाठी ठेकेदार कंपन्यांना सक्त सूचना देणे गरजेचे आहे. मात्र मागील तीन वर्षात प्रांताधिकारी, तहसिलदार तसेच आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सूचनांकडे सातत्याने कानाडोळाच होताना दिसत आहे.

राज्य मंत्रीमंडळातील सदस्यांनाही ठेकेदार कंपन्यांसह महामार्ग प्राधिकरणाकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. ठेकेदार कंपनीच्या मनमानीकडे पहात बसण्याशिवाय मागील दोन वर्षात महामार्ग प्राधिकरणाने काहीच केलेले नाही. त्यामुळेच आता ठेकेदार कंपनीच्या मनमानीसह लहरीपणास कोण व कधी चाप लावणार ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news