

सातारा : भारतातील एकही गरीब कच्च्या घरात राहणार नाही. सर्वांसाठी पक्की घरे हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. महाराष्ट्राला एका वर्षांत सर्वाधिक 30 लाख घरांचे उद्दिष्ट दिले.1 जुलैपासून ग्रामीण भागाच्या विकासासाठी विकसित भारत जी रामजी योजना सुरू होत आहे. देशात 3 कोटी लखपती दिदी केल्या. महाराष्ट्रात 1 कोटी लखपती दिदी करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री व ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली.
साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पाच लाख घरांचे लोकार्पण केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शिवराजसिंह चौहान म्हणाले, महाराष्ट्राने घरकूल योजनेतील प्रत्येक घर सौर उर्जेवर आणून शून्य वीज बिल हे उद्दिष्ट साध्य केले. राज्याने विक्रमी कमी वेळेत पाच लाख घरे पूर्ण केली.
भूमिहिनांना 1 लाख रूपयांची मदत करण्यात आली. उर्वरित घरे लवकरात लवकर पूर्ण होतील. देशात 3 कोटी दिदी लखपती झाल्या आहेत. यापुढे 6 कोटी लखपती दिदींचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रात 1 कोटी लखपती दिदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जुलैपासून ग्रामीण भागाच्या विकासासाठी विकसित भारत जी रामजी योजना सुरू होत आहे. यातून ग्रामीण भागाचा कायापालट होईल. गावच्या विकासाचा आराखडा गावातच बनवला जाईल. ग्रामीण भागाच्या विकासाचा वेग वाढेल. शेतकरी व शेती समृद्ध करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. पश्चिम आशियातील व बांग्लादेशातील संकटामुळे कांद्याचे भाव पडले होते.
कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी आजपासूनच नाफेडच्या माध्यमातून 12 रूपये 35 पैसे किलो दराने कांदा खरेदी सुरु करण्यात आली आहे. कापूस, सोयाबीन, तुरीसह अनेक पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे. साखरेच्या एमएसपी संदर्भात लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ. देशाचा पैसा व वेळ वाचवण्यासाठी एक देश एक निवडणक या तत्त्वानुसार सर्व राज्यांच्या विधानसभेच्या आणि लोकसभेची निवडणूक एकाचवेळी घेण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला पाठिंबा द्यावा. संकटाच्या वेळेत देश म्हणून सर्वांनी एकत्र उभे रहावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.