

सुरेश सूर्यवंशी
उंब्रज : राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 2005 नंतर शिक्षकेतर पदांची भरती झालेली नाही. ही बंदी उठविण्यासाठी शिक्षकेतर संघटनेबरोबरच इतर संघटनांनी लढा उभारला. त्यांच्या मागणीला 2019 च्या सुधारित आकृतीबंधाने आधार मिळाला आहे.
परंतु, 2019 चा नवीन आकृतीबंध जाहीर करून शासन शांत राहीले. त्यानंतर आता 2026 मध्ये पुन्हा शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी नवीन निकष आणि पात्रतेसंदर्भात महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, 2026 बनविण्यात आला आहे. त्यानुसारच आता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याने शिक्षकेतर भरती प्रक्रीयेला तब्बल 21 वर्षांनी वेग येणार असल्याचे शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी सांगितले.
शिक्षकेतर भरतीसाठी शासनाने आता पावले उचलली असून, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी नव्याने पात्रता तसेच निकष जाहीर केले आहेत. त्याला महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, 2026 असे संबोधण्यात येणार असून याच नियमांच्या आधारे भरती केली जाणार असल्याची माहिती शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी दिली. साधारण तीस हजार पदांची होऊ शकते भरती राज्यातील शाळांमध्ये कनिष्ठ लिपिकांची 17 हजार 695 पदे, वरिष्ठ लिपिकांची 4 हजार 912 पदे, मुख्य लिपिकांची 923 पदे असतील. तर ग्रंथपालांची 2 हजार 118 पदे तर प्रयोगशाळा सहायक नववी ते दहावीची 4 हजार 685 पदे निर्माण होणार आहेत. सोबतच प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिक 2 हजार 40 पदेही यातून निर्माण केली जाणार आहेत. या निर्णयाने जेथे पदे रिक्त आहेत येथे भरतीसाठी संधी उपलब्ध होणार आहे.
पदभरतीचे नवीन निकष पुढीलप्रमाणे : कनिष्ठ लिपिक - विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता आणि टंकलेखन किंवा संगणक टंकलेखनातील शासनाने अधिकृत केलेल्या साम प्राधिकाऱ्यांने दिलेले मराठी टंकलेखनाची प्रति मिनिट 30 शब्द किंवा इंग्रजी टंकलेखनाची प्रति मिनिट 40 शब्द या गतीचे प्रमाणपत्र.
वरिष्ठ लिपिक - नियमित वेतनश्रेणीसह कनिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या व त्या पदावर तीन वर्षांहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तींमधून जेष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर योग्य व्यक्तीची पदोन्नती.
प्रमुख लिपिक - वरिष्ठ लिपकि हे पद धारण करणाऱ्या व या पदावर 3 वर्षांहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तींमधून जेष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने.
ग्रंथपाल - सांविधिक विद्यापीठाची ग्रंथालय विज्ञान विषयातील पदवी किंवा मान्यता प्राप्त संस्थेच्या ग्रंथालय विज्ञान विषयाच्या पदविकेसह संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
प्रयोगशाळा सहाय्यक - मान्यता प्राप्त परीक्षा मंडळातून 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण. शिपाई - मान्यता प्राप्त परीक्षा मंडळातून 12 वी उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींमधून वेळोवेळी शासनाच्या मान्यतेने विभागाने विहीत केलेल्या धोरणानुसार अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती.