

कराड : विधीमंडळ सार्वभौम असते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी तेथे येऊन मारहाण केली. पोलिसांनी मार खाणार्यावर गुन्हा दाखल केला. मारणार्यांपैकी केवळ एकावर गुन्हा दाखल केला.सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणी मारले हे दिसले असताना पोलिसांनी पक्षपातीपणा केला. आ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर सुध्दा गुन्हा दाखल केला. पकडलेल्या आरोपीला पोलिसाने तंबाखू मळून दिली. अशीच परिस्थिती राज्यभर आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य राहिलेले नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नुतन प्रदेश अध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांनी केला.
प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर आ.शिंदे यांनी शनिवारी कराड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री व सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, दीपक पवार, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, प्रशांत यादव, सौरभ पाटील, संगीता साळुंखे, अॅड.विद्याराणी साळुंखे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ.शिंदे म्हणाले, सातारा जिल्हा हा स्व.यशवंतराव चव्हाण, स्व.पी.डी.पाटील तसेच क्रांतीकारकांच्या विचारांचा आहे. या जिल्ह्याने स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर शरद पवार यांच्यावर खूप प्रेम केले आहे. यशवंतरावांच्या विचारांचा महाराष्ट्र उभा करण्याची प्रेरणा घेण्यासाठी समाधीस्थळी आलो आहे. आ.जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष अडचणीच्या काळात समर्थपणे सांभाळला आहे. येणार्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तरी सामान्य जनतेच्या ताकदीवर पक्ष मजबूत करणे, महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न जाणून घेणे, यावर विशेष लक्ष देणार आहे. पक्ष मजबुतीच्या अनुषंगाने पुण्यात तीन दिवस बैठका झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यापर्यंत दौरे करणार आहोत.
महाराष्ट्र जातीवाद्यांपासून मुक्त व्हावा, अशी अपेक्षा स्व. चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी व्यक्त केली असल्याचे सांगून आ. शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात धर्मवाद, जातीवाद वाढला आहे. विकासाऐवजी उद्योगपतींचा महाराष्ट्र अशी ओळख बनली आहे. येथे राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जातात. कायदे केले जातात. त्याच सभागृहामध्ये जी घटना घडली ती निंदनीय आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पास दिले गेले होते. सभापती आणि अध्यक्षांकडे याबाबत भूमिका मांडली होती. मात्र ही बाब गांभिर्याने घेतली गेली नाही. परिणामी गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक सभागृहात आले. सभागृहाच्या दालनाच्या बाहेर त्यांनी हाणामारी केली. सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ता नितीन देशमुख त्याला मारहाण झाली. पोलिसांनी मार खाणार्यावर गुन्हा दाखल केला. मारहाण करणार्यांपैकी केवळ एकावर गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणी मारले हे दिसले असताना पोलिस पक्षपाती वागले, असा आरोप आ. शिंदे यांनी केला.