

सातारा : दोन्ही संघटनेच्या वादात वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रखडली होती. अखेर त्याला मुहूर्त मिळाला असून यंदाची स्पर्धा अहिल्यानगरच्या मातीत रंगणार आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अहिल्यानगरला दि. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा होणार असून 2023 नंतर 2025 रोजी ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार असल्याने सातारा जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ या दोन्ही संघटनांमध्ये खरी संघटना कोणाची यावरून गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु आहे. त्यामुळे 2023 रोजी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेला मुहूर्त लागत नव्हता. मात्र, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धा दि. 29 जानेवारी ते दि. 2 फेब्रुवारी दरम्यान वाडिया पार्क येथे आयोजित करण्यात आली आहे. तसेच शहर व जिल्हा संघांनी शहर व जिल्हा कुस्तीगीर, तालीम संघाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा घेण्यात याव्यात, निवड चाचणीतून निवडलेल्या संघाची गादी व माती अशी वेगवेगळी प्रवेशिका संघाच्या लेटरहेडवरती खेळाडू, मार्गदर्शक व व्यवस्थापकांच्या नावासह दि. 25 जानेवारी पूर्वी मेलवर व किंवा पत्त्यावर पाठवावे, असे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने आवाहन केले आहे.
या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास संलग्न असलेल्या 36 जिल्हे, 6 महानगरपालिका असे एकुण 42 संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेत एकूण 840 कुस्तीगीर सहभागी होत असून स्पर्धेदरम्यान 850 ते 900 कुस्त्या होतील. 100 पंच आणि 80 पदाधिकार्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, सिकंदर शेख, हर्षवर्धन सदगीर, बाला रफीक शेख, महेंद्र गायकवाड, पृथ्वीराज मोहोळ, वेताळ शेळके, माऊली कोकाटे, शुभम शिंदनाळ, सुदर्शन कोतकर, माऊली जमदाडे हे प्रमुख आकर्षण असणार आहेत. तर स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री पै. मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस उपस्थित राहणार आहेत.