

सातारा : राज्यात सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना तातडीने मदत करण्यास शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. बाधित शेतकर्यांना तत्काळ मदत व्हावी म्हणून 23 जिल्ह्यांतील 33 लाख 65 हजार 544 शेतकर्यांच्या 27 लाख 59 हजार 754.77 हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांच्या मदतीसाठी तीन हजार 258 कोटी 56 लाख 47 हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
ना. पाटील यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुखमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदत व पुनर्वसन विभागामार्फत नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकर्यांना तातडीने मदत करण्यासाठी युद्धपातळीवर काम केले जात आहे. मागील सात दिवसांत सुमारे पाच हजार कोटींवर निधी वितरित करण्याचे आदेश काढले असून यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत सुमारे सात हजार 500 कोटींची मदत वितरणास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आपदग्रस्त शेतकर्यांना दिलासा मिळून त्यांचे जीवन अधिक सुकर होईल, असा विश्वास ना. पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पुणे विभागातील आठ लाख 25 हजार 189 शेतकर्यांच्या सात लाख नऊ हजार 209.15 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 951 कोटी 63 लाख 37 हजार निधीचा समावेश आहे. नागपूर विभागातील तीन लाख 76 हजार 968 शेतकर्यांच्या तीन लाख 44 हजार 629.34 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 340 कोटी 90 लाख 8 हजार निधीचा समावेश आहे. अमरावती विभागातील चार लाख 78 हजार 909 शेतकर्यांच्या पाच लाख 26 हजार 381.36 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 463 कोटी 8 लाख 30 हजार निधीचा समावेश आहे. नाशिक विभागातील 15 लाख 79 हजार 239 शेतकर्यांच्या 11 लाख 50 हजार 301.76 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 1474 कोटी 84 लाख 9 हजार निधीचा समावेश आहे. कोकण विभागातील एक लाख पाच हजार 239 शेतकर्यांच्या 29 हजार 233.16 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 28 कोटी 10 लाख 63 हजार निधीचा समावेश आहे.