Eye Transplants : राज्यात ३ हजारांवर डोळ्यांचं प्रत्यारोपण

वर्षभरात ६ हजार १२३ डोळ्यांचे दान : मृत्यूनंतरही नेत्रदानातून दृष्टीची नवी पहाट
Human Eye
Eyefile photo
Published on: 
Updated on: 
विशाल गुजर

सातारा : दृष्टी ही मानवी जीवनातील अमूल्य देणगी असून, तिचे संरक्षण आणि दृष्टी गमावलेल्या व्यक्तींना पुन्हा प्रकाशाची संधी देण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. दरवर्षी दि. ८ ऑक्टोबर रोजी साजरा होणारा जागतिक दृष्टी दिन याच उद्देशाने महत्त्वाचा ठरतो. डोळ्यांचे आरोग्य, अंधत्वाची कारणे, उपलब्ध उपचारपद्धती आणि दृष्टिदानाचे महत्त्व याबाबत समाजात व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात वर्षभरात ३ हजार ५४८ जणांनी एकूण ६ हजार १२३ डोळ्यांचे दान केले असून, त्यापैकी ३ हजार ९७ डोळ्यांचा प्रत्यारोपणासाठी वापर करण्यात आला आहे. कॉर्नियाच्या आजारामुळे दृष्टी गमावलेल्या रुग्णांसाठी अशा प्रत्यारोपणामुळे पुन्हा दृष्टी मिळण्याची संधी उपलब्ध होते.

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दृष्टिदान करायचे असल्यास कुटुंबीयांनी तातडीने जवळच्या अधिकृत नेत्रपेढीशी संपर्क साधणे आवश्यक आहे. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते अलगद बंद करावेत. मृतदेहाच्या डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात. डोळ्यांवर ओला कापूस किंवा ओला रुमाल ठेवावा आणि पंखा बंद ठेवावा. माहिती मिळाल्यानंतर नेत्रपेढीचे प्रशिक्षित पथक संबंधितांच्या घरी पोहोचून साधारण २० ते २५ मिनिटांत डोळे काढण्याची प्रक्रिया पूर्ण करते. यासाठी मृत्यूचे कारण स्पष्ट करणारे डॉक्टरांचे पत्र आवश्यक असते. या प्रक्रियेदरम्यान रक्ताचे नमुनेही घेतले जातात.

नेत्रपेढीत आणलेल्या डोळ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. कॉर्नियामधील पेशींची संख्या आणि गुणवत्ता तपासल्यानंतर त्यांचा प्रत्यारोपणासाठी उपयोग निश्चित केला जातो. चांगल्या गुणवत्तेचा कॉर्निया दृष्टी पुनर्संचयित करण्यासाठी वापरता येतो. प्रत्यारोपणासाठी योग्य नसलेल्या ऊतींचा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी उपयोग होऊ शकतो.

दृष्टिदानाची प्रक्रिया अधिक परिणामकारक करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जात आहे. मृत व्यक्तीच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांचा प्रत्यारोपणासाठी किती उपयोग होऊ शकतो, याचा अंदाज घेण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. दृष्टिदान करणाऱ्या व्यक्ती आणि त्याचा लाभ मिळालेल्या रुग्णांची माहिती संगणकीय प्रणालीमध्ये नोंदविण्यात येत असून, गरज असलेल्या ठिकाणी उपलब्धतेनुसार डोळ्यांचे वितरण करण्याची प्रक्रिया अधिक सुसूत्र करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मृत्यूनंतरच दृष्टिदानाची प्रक्रिया केली जाते. बालकांपासून वृद्धांपर्यंत अनेक व्यक्ती दृष्टिदान करू शकतात. चष्मा वापरणाऱ्या व्यक्तींनाही दृष्टिदान करता येते. रक्तदाब, मधुमेह, दमा किंवा मोतिबिंदूची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींच्या बाबतीतही परिस्थितीनुसार दृष्टिदान शक्य असते. दृष्टिदानाला कोणत्याही धर्माचा विरोध नाही.

मृत्यूनंतर संपूर्ण डोळा काढून दुसऱ्या व्यक्तीला बसवला जातो, हा समाजातील एक गैरसमज आहे. प्रत्यक्षात प्रत्यारोपणासाठी डोळ्याच्या पुढील पारदर्शक भागाला म्हणजेच कॉर्नियाला महत्त्व असते. कॉर्नियामध्ये दोष निर्माण झाल्यास दृष्टी कमी होऊ शकते किंवा अंधत्व येऊ शकते. योग्य रुग्णांमध्ये कॉर्नियल प्रत्यारोपणाद्वारे दृष्टी सुधारण्याची संधी मिळते. दान केलेल्या डोळ्यांमधील योग्य ऊती प्रत्यारोपणासाठी वापरल्या जातात, तर इतर भाग वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी उपयोगी ठरू शकतात.

राज्यात ७८ नेत्रपेढ्या; १४६ प्रत्यारोपण केंद्रे...

राज्यात सध्या ७८ नेत्रपेढ्या सक्रिय असून १४६ नेत्र प्रत्यारोपण केंद्रांची शासनाकडे नोंद आहे. अनेक जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांमध्ये दृष्टिदानासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना योग्य माहिती देणे, दृष्टिदानाचे महत्त्व पटवून देणे आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करणे, ही समुपदेशकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबीय दुःखात असतात. त्यामुळे अशा वेळी दृष्टिदानाचा विचार त्यांच्या लक्षात राहीलच असे नाही. त्यामुळे प्रशिक्षित समुपदेशकांमार्फत कुटुंबीयांचे संवेदनशीलपणे समुपदेशन करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news