

सातारा : राज्याच्या उत्पन्नात 1 ट्रिलियनची वाढ झाली पाहिजे, हा उद्देश पुढे ठेवत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोअर रोड नेटवर्क तयार केला आहे. यासाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकने (एआयबी) पहिल्या टप्प्यात 1500 किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध केला आहे. लवकरच हे काम सुरू होईल, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना ना. शिवेंद्रराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पूर्वीची एशियन डेव्हलपमेंट बँक आता एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँक (एआयबी) झाली आहे. त्यांच्याकडूनच पहिल्या फेजमध्ये रस्त्यासाठी निधी उपलब्ध होत आहे. या कामाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचना केल्या आहेत.
त्यानुसारच काम केले जाणार आहे. त्यासाठी काही निवडक कामांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्यातील रस्ते एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी कोअर रोड नेटवर्क तयार केले आहे. 2047 सालापर्यंतची रोडची अमृतकाल योजना तयार केली असून, त्यातूनच ही कामे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अशी वाढणार कनेक्टिव्हिटी...
रस्त्यामुळे राज्याच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी कामे केली जाणार आहेत. राज्यातील विमानतळ, ड्रायपोर्ट, औद्योगिक वसाहती, पर्यटन क्षेत्र, धार्मिक क्षेत्र यासह महामार्ग एकमेकांना जोडणे. रस्त्यांच्या या जाळ्यांमुळे पर्यटन, उद्योगासह इतर ग्रामीण उद्योगांना बाजारपेठा जवळ होण्यास मदत मिळेल. त्यातून राज्याच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत मिळेल, असेही मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.