

सातारा : जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया ऐन भरात असताना, आवश्यक विविध दाखल्यांसाठी पालक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ‘महाऑनलाईन’ पोर्टलच्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे दाखले मिळवण्याची प्रक्रिया एक डोकेदुखी ठरली असून, पालकांना तलाठी कार्यालयापासून ते सेतू केंद्रांपर्यंत हेलपाटे मारावे लागत आहेत.
सर्व्हर दिवसा बंद आणि रात्री उशिरा सुरू होत असल्याने, सेतू कार्यालयातील कर्मचार्यांवरही अतिरिक्त कामाचा बोजा पडला असून, जिल्ह्यात ‘महाऑनलाईन’मुळे दाखल्यांचा अक्षरशः ‘महागोंधळ’ उडाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
दाखले मिळवण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना पहाटेपासून सेतू कार्यालयांबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत. सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेतच दाखल्यांचे वितरण होत असल्याने, अनेकांना आपला रोजचा रोजगार बुडवून यासाठी वेळ द्यावा लागतो. अनेक दिवस चकरा मारूनही दाखले वेळेत मिळत नसल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सेतू कार्यालयांमधील प्रचंड गर्दी आणि त्यामुळे होणारी गैरसोय नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
महाऑनलाईन प्रणालीतील हा गोंधळ तातडीने दूर करून सर्व्हरची क्षमता वाढवावी, अशी जोरदार मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे. जोपर्यंत ही तांत्रिक समस्या पूर्णपणे सुटत नाही, तोपर्यंत प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करून दाखले वेळेवर मिळतील याची काळजी घ्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशावर विपरित परिणाम होणार नाही. शासनाने डिजिटल सुविधा देताना त्या अधिक कार्यक्षम, सोप्या आणि अखंडित कशा राहतील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
‘महाऑनलाईन’ ही महाराष्ट्र सरकारची एक डिजिटल सेवा आहे. या डिजिटल सेवेतून विविध सरकारी योजना आणि मोबाईल अॅप्लिकेकशनद्वारे नागरिकांना शासकीय सेवांमध्ये सहभागी होण्याची सुविधा पुरवते. या महाऑनलाईनद्वारे विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करणे, प्रवेश प्रक्रिया (तांत्रिक, व्यावसायिक, कृषी शिक्षण इ.), कृषी उपकरणांसाठी अनुदान, शेतकर्यांसाठी योजना, राज्यातील भरती प्रक्रियेसाठी अर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजना, सामाजिक कल्याण, आरोग्य विमा, पेंशन योजना इ. सेवा दिल्या जातात.