Mahabaleshwar water issue: सर्वाधिक पावसाच्या महाबळेश्‍वरमध्ये पाण्याची ओरड; ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ची वेळ

शहरात कृत्रिम टंचाई
water crisis
water crisisfile photo
Published on
Updated on

महाबळेश्‍वर : सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्‍वरमध्ये उन्हाळी पर्यटन हंगामाच्या अखेरीस तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दररोज हजारो पर्यटक शहरात दाखल होत असताना अनेक भागांतील नागरिकांना पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. हंगामपूर्व नियोजनाचा अभाव, पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाबळेश्‍वर शहरातील मुख्य बाजारपेठ, डॉ. साबणे रोड, कोळी आळी, रामगड, अंबिका व नामदेव सोसायटी, नगरपालिका सोसायटी, स्कूल मोहल्ला, गवळी मोहल्ला आदी भागांत पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. काही ठिकाणी एक कळशी पाणी भरण्यास पाच मिनिटांहून अधिक वेळ लागत असून अनेक भागांत पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याची तक्रार आहे.

वेण्णा तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरात निर्माण झालेली परिस्थिती नैसर्गिक नसून व्यवस्थापनातील त्रुटींमुळे उद्भवलेली ‘कृत्रिम पाणीटंचाई’ आहे. काही ठिकाणी थेट मोटारी लावून पाणी खेचले जात असल्याने इतर भागांचा पाणीपुरवठा बाधित होत आहे. मात्र, अशा प्रकारांवर प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत एप्रिल महिन्यात झालेल्या आढावा बैठकीत वेण्णा तलावातील पाणीसाठा पुढील १०० दिवस पुरेल, अशी माहिती मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली होती. मात्र सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. नगरपालिकेचा टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा सध्या बंद असल्याने नागरिकांना खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काही टँकर चालकांकडून प्रति टँकर एक ते दोन हजार रुपये आकारले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news