Satara News : वेण्णालेक कमानी पुलाचे काम रखडले

खोदकामामुळे नदीपात्रात माती जाण्याचा धोका; मातीचे ढिगारे साचले
Satara News
वेण्णालेक कमानी पुलाचे काम रखडले
Published on
Updated on

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील वेण्णा लेक परिसरात पर्यायी रस्त्यासाठी उभारण्यात येत असलेल्या कमानी पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सुमारे 25 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणारा हा पूल जून अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात ठेकेदाराने काम थांबवल्याने प्रकल्प रखडल्याची चर्चा सुरू आहे.

वेण्णालेक परिसरातील या कामासाठी करण्यात आलेल्या खोदकामातून निघालेली शेकडो टन माती थेट वेण्णा नदीपात्रात साठवून ठेवण्यात आली आहे. पावसाळा तोंडावर असताना ही माती अद्याप हटवण्यात आलेली नसल्याने जोरदार पावसात ती नदीपात्रात वाहून जाऊन मोठ्या प्रमाणावर गाळ साचण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठेकेदार निधीअभावी काम सोडून गेल्याची चर्चा असताना अधिकारी मात्र वेगळे कारण देत आहेत. पुलाच्या कामावरील मजूर हे पश्चिम बंगालमधील असून तेथील निवडणुकांसाठी गेले असल्यामुळे काम थांबले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

महाबळेश्वर-पाचगणी मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेण्णा लेकला वळसा घालणारा हा पर्यायी रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पर्यटन हंगामात वेण्णा लेक आणि मॅप्रो गार्डन परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने हा बायपास रस्ता आणि कमानी पूल वाहतूक व्यवस्थापनासाठी मोठा दिलासा ठरणार होता. या प्रकल्पाअंतर्गत सुमारे 1,750 मीटर लांबीचा रस्ता, छोटा पूल आणि वेण्णा लेक सांडव्याखाली कमानी पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. अप्सरा हॉटेलमार्गे वाहतूक शहरात वळवण्याची योजना असून त्यासाठी एकूण 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

वन विभागाच्या परवानग्या, वेण्णा धरणाच्या उंचीचा मुद्दा आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे हे काम अनेक वर्षे रखडले होते. अखेर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर कामाला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात कमानी पुलासाठी खोदकाम करून मोठे खांब उभारण्यात आले. मात्र, त्यानंतर काम थांबले असून वेण्णा नदीपात्रात मातीचे मोठे ढिगारे साचलेले आहेत. शेतकरी आणि ग्रामस्थांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या ढिगाऱ्यांमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले असून पावसाळ्यापूर्वी माती हटवली नाही तर आंदोलन करू, असा इशारा शरद बावळेकर यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news