Satara News : महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांना पाचगणीत टोलमाफी

टोलनाक्यावर लावले माहिती फलक : प्रशासनाचे पर्यटकांना आवाहन
Satara News
महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांना पाचगणीत टोलमाफी
Published on
Updated on

पाचगणी : पर्यटन हंगामामुळे महाबळेश्वर आणि पाचगणी येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना, महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटक वाहनांकडून पाचगणीत प्रवासी कर आकारला जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर पाचगणी नगरपालिकेने महत्त्वाची स्पष्टता देत महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांकडून प्रवासी कर घेतला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच याबाबत जनजागृती करण्यासाठी टोल नाका परिसरात माहिती फलक उभारण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील म्हणाले, ‌‘महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांकडून नियमानुसार कर आकारला जाणार नाही. अनेक पर्यटकांना नियमांची स्पष्ट माहिती नसल्याने संभ्रम निर्माण होत होता. त्यामुळे टोल नाका परिसरात माहिती देणारे फलक लावण्यात आले असून संबंधित कर्मचाऱ्यांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा.

नगराध्यक्ष दिलीप बगाडे म्हणाले, महाबळेश्वर आणि पाचगणी ही राज्यातील महत्त्वाची पर्यटनस्थळे असून येथे येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा मनस्ताप होऊ नये, ही आमची भूमिका आहे. पर्यटकांवर अनावश्यक आर्थिक भार पडू नये यासाठी नगरपालिका प्रयत्नशील आहे. पर्यटन वाढीसाठी प्रशासन, नगरपालिका आणि नागरिक एकत्रितपणे काम करत आहेत.

सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लॉन्ग वीकेंडमुळे महाबळेश्वर-पाचगणी मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होत आहे. मुंबई, पुणे तसेच राज्यातील विविध भागांतून दररोज हजारो पर्यटक या पर्यटनस्थळांकडे येत असल्याने टोल नाक्यावर काही प्रमाणात गोंधळ निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. काही पर्यटकांनी महाबळेश्वरकडे जात असतानाही टोल आकारला जात असल्याची नाराजी व्यक्त केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेत स्पष्ट सूचना जारी केल्या. आता टोल नाका परिसरात ‌‘महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांना टोलमाफी‌’ अशा आशयाचे फलक लावण्यात आले असून त्यामुळे वाहन चालकांचा संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, पर्यटन हंगामात वाहतुकीचा ताण वाढत असल्याने पोलिस प्रशासन आणि नगरपालिका यांच्यावतीने वाहतूक नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. पर्यटकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news