

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील कोयना बॅकवॉटर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या पर्यटक तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
संकेत विठ्ठल जाधव (वय 24, रा. सोनवाडी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) असे मृत पर्यटक युवकाचे नाव आहे. संकेत आपल्या मित्रासोबत महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आला होता. सकाळी तो मित्रासोबत मॉर्निंग वॉकसाठी गेला होता. वॉकदरम्यान तो कोयना बॅकवॉटरजवळ थांबला. त्यानंतर पाण्यात पोहण्यासाठी उतरल्याचे सांगितले जाते. पाण्यात उतरल्यानंतर काही वेळ तो पोहत होता. मात्र, अचानक त्याने हातपाय हलवणे थांबवले आणि काही अंतरावर पाण्यात बुडाला. ही घटना पाहून त्याच्या सोबत असलेल्या मित्राने व स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.
स्थानिक नागरिक व हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालय, महाबळेश्वर येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. याबाबतची फिर्याद श्याम चंद्रावत (रा. सावेडी, जि. अहिल्यानगर) यांनी दिली. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पर्यटकांनी पोहताना काळजी घ्यावी. सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.