

सातारा : मागील पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा घसरलेलाच आहे. त्यामुळे जिल्ह्यात हुडहुडी कायम आहे. शीत लहरींमुळे दिवसभर वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. बोचऱ्या थंडीमुळे अवघे जनजीवन गारठून गेले आहे. सोमवारी सातारा 10.8, महाबळेश्वरातील वेण्णालेक व लिंगमळा परिसरातील तापमान 8 अंशांपर्यंत नोंदवण्यात आले आहे. थंडीच्या कडाक्यामुळे लहानगी, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच वयोगटामध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहे.‘ ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून शहरासह ग्रामीण भागातील दवाखाने रुग्णांच्या गर्दीमुळे हाऊसफुल्ल झाले आहेत.
या वर्षी थंडीला नेहमीच्या तुलनेत उशीरा सुरुवात झाली असली तरी तापमानात कमालीची घट होत आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे. तापमानाचा पारा घसरु लागला आहे. रात्रपाळीत काम करणारे कमगार, वृत्तपत्र विक्रेते व इतर कष्टकऱ्यांंनी थंडीपासून बचावासाठी जागोजागी शेकोट्या पेटवल्या होत्या. शुक्रवारी ढगाळ हवामान राहिल्याने दिवसभर थंडीने हुडहुडी भरत होती. शीतलहरींमुळे दिवसभरच हवेत गारठा जाणवत होता.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम आहे. दिवसादेखील थंडीचा मारा नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अवघे जनजीवन गारठून गेले आहे. पुढील काही दिवस थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी विषेश काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ञांकडून देण्यात येत आहे. दिवसेंदिवस जिल्ह्याचे तापमान घटू लागल्याने थंडीचा जोर वाढत आहे. थंडीचा कडाका वाढल्याने लहानग्यांसह ज्येष्ठ व व्याधीग्रस्तांना त्रासदायक ठरत आहे. अचानक वातावरणातील हा बदल अनेकांच्या आरोग्यासाठी पचनी पडला नसल्याने सर्दी, खोकल्यासारखे आजार बळावले आहेत. थंडी वाढल्याने वात, कफ प्रकृतीच्या व्यक्तींना अधिक त्रास होतो. गारठ्यामुळे सांधे व वातविकार डोके वर काढत आहेत. कफविकार बळावत असून त्वचेच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत.
हुडहुडीतही थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन
सेलिब्रेशनसाठी अवघे जनजीवन आसुसले आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेल-धाबे व्यावसायिकही खवय्यांच्या फर्माईश पूर्ण करण्यासाठी ऑफर्ससह सरसावले आहेत. एरवी थंडी वाढल्यावर सायंकाळी सातच्या आतच घरात जाणे पसंत केले जातेे. मात्र, वर्षाअखेरीच्या सेलिब्रेशनसाठी हुडहुडीतही हॉटेल-धाब्यांवर गर्दी होत आहे.