

महाबळेश्वर : देश-विदेशातील पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे वातावरणात झालेल्या बदलामुळे पर्यटकांसह स्थानिकांना भर उन्हाळ्यातही गारव्याचा सुखद अनुभव येत आहे. दिवसभर तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जात असताना, सायंकाळी ते थेट 15 ते 16 अंशांपर्यंत घसरत असल्याने वातावरणात गारवा निर्माण होत आहे. पारा घसरल्याने पर्यटकही सुखावत आहेत. त्यामुळे सायंकाळनंतरच अनेक जण पॉईंटस्वर गर्दी करत असल्याचे चित्र आहे.
उन्हाळी हंगामामुळे महाबळेश्वरात पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. नवविवाहित दाम्पत्ये, बालचमू तसेच ज्येष्ठ नागरिक पर्यटनासाठी दाखल होत आहेत. वेण्णा लेक परिसरात सायंकाळच्या वेळेस गार वाऱ्याचा आनंद घेत पर्यटक तासन्तास वेळ घालवत असून, नौकाविहारासाठीही गर्दी होत आहे.
याशिवाय विविध प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची वर्दळ कायम आहे. सायंकाळच्या सुमारास मुख्य बाजारपेठेत खरेदीसोबतच महाबळेश्वरमधील स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना पर्यटक दिसत आहेत. चटपटीत व चमचमीत पदार्थांवर ताव मारताना पर्यटकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. दिवसभर उष्णता जाणवत असली तरी सायंकाळी तापमानात मोठी घट होत असल्याने पर्यटकांना थंडीची अनुभूती मिळत आहे. या आल्हाददायक हवामानामुळे आगामी काळात पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.