

सातारा : सातारा जिल्ह्यात शनिवारी थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचा पारा 13.2 अंश तर सातारचा पारा 16.6 अंशावर गेला होता. त्यामुळे शनिवारीही जिल्ह्यात हुडहुडी कायम होती.
सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीची लाट निर्माण झाली आहे. शुक्रवारी तर दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. शनिवारीही अधूनमधून ढगाळ वातावरण होते. दिवसभर गारठा जाणवत होता. थंडीमुळे पहाटेच्यावेळी फिरावयास जाणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. वाढत्या थंडीमुळे तापमानात चढ - उतार कायम आहे. शनिवारी थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचा किमान पारा 13.2 अंश तर कमाल पारा 24.5 अंश तर सातारचे किमान पारा 16.6 अंश तर कमाल पारा 29.2 अंशावर होता.
वाढत्या थंडीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात चौकाचौकात शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. त्यामुळे शेकोटीभोवती गप्पांचे फड रंगत आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांना बाजारपेठेत मागणी वाढली आहे. मोती चौक, राजवाडा, राजपथ, जि.प. मैदान परिसर, पोवईनाका, खणआळी परिसरात उबदार कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. स्वेटर, जर्कीन्स, हॉफ स्वेटर, उबदार टोपी, हातमोजे, शाल, मफलर, अन्य साहित्याला ग्राहकांमधून चांगली मागणी आहे. थंडीची तीव्रता गेल्या काही दिवसांमध्ये कमी-जास्त होवू लागली आहे. ढगाळ वातावरणामुळे शुक्रवारी थंडी वाढली होती. तुलनेने शनिवारी काही प्रमाणात ही थंडी कमी जाणवली. वृद्ध व लहान मुलांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.