

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरात सुरू असलेल्या पावसामुळे महाबळेश्वर–तापोळा मार्गावर पाणी साचल्याचे दिसून आले. शहरातील वन विभाग कार्यालयासमोरील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिक, शालेय विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी गटारांची स्वच्छता न झाल्याने ही परिस्थिती ओढवली. यामुळे पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागली.
वन विभाग कार्यालयासमोरील गटारांमध्ये पडलेले मोठे दगड, तुटलेले पाईप आणि साचलेला गाळ अद्यापही हटवण्यात आलेला नाही. त्यामुळे सेठ गंगाधर माखरिया हायस्कूल परिसरापासून पोलीस परेड मैदानापर्यंत तसेच वन विभाग कार्यालय ते स्कुल मोहल्ला या मार्गावरील गटारे तुंबली आहेत. पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचत आहे. परिणामी संपूर्ण रस्ता जलमय झाला असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
महाबळेश्वर पालिका हद्दीतील सेठ गंगाधर माखरिया शाळेपासून कारवी आळीपर्यंतच्या मुख्य रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. एप्रिल महिन्यात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते भूमिपूजनही करण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर करण्याचा निर्णय झाल्याने नागरिकांना खड्डे आणि धुळीचा सामना करावा लागला. स्थानिकांनी सोशल मीडियावर आवाज उठवल्यानंतर पालिकेने काही दिवस रस्त्यावर पाणी मारण्यापुरती औपचारिकता केली; मात्र खड्डे बुजविण्याची तात्पुरती उपाययोजनाही करण्यात आली नाही.
याचा फटका आता पावसाळ्यात बसत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रोज किरकोळ अपघात होत आहे. अपघातांची मालिका सुरू असतानाही पालिका प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने पालिका एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतर अधिकारी लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित होत आहेत.