

पाचगणी : राज्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणार्या महाबळेश्वर तालुक्यात यंदा प्रथमच पावसाची तुट जाणवल्याने दुष्काळग्रस्तांच्या यादीत आला आहे. जुलै महिना वगळता इतर महिन्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महसूल व कृषी विभागाने तालुक्यात पाहणी करून पंचनाम्यांना सुरूवात केली आहे. काही दिवसांमध्ये सुमारे ३२ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.
शासनाने महाबळेश्वर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केल्यानंतर शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकांकडून गावोगावी प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत तालुक्यातील ४२ गावांमध्ये पाहणी पूर्ण करण्यात आली आहे. ३२ हेक्टर क्षेत्रावरील ७८१ खातेदारांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.उर्वरित गावांमधील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी व पंचनामे टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत.
महाबळेश्वर तालुक्यात एकूण ११३ गावे असून तालुक्यातील एकूण पेरणी क्षेत्र ४३९४ हेक्टर आहे. या शेती क्षेत्रावर सुमारे १७ हजार खातेदार अवलंबून आहेत. दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पावसाअभावी पिकांवर झालेल्या परिणामाची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त क्षेत्राची नोंद केली जात आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही पंचनाम्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. शेतशिवारात प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची सद्यस्थिती, पिकांचे नुकसान झालेले क्षेत्र, पावसाचा परिणाम आदी बाबींची पाहणी केली जात आहे. संबंधित शेतकऱ्यांकडूनही आवश्यक माहिती घेऊन शासनाच्या निकषांनुसार नुकसानीची नोंद करण्यात येत आहे.
कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह महसूल अधिकारी,पोलीस पाटील आणी शेतकरी यांच्या उपस्थितीत पाहणी करून पंचनामे करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष शेतशिवाराची पाहणी करून नुकसानीची माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील उर्वरित गावांमध्येही महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकांकडून पाहणी सुरू राहणार आहे. सर्व नुकसानग्रस्त क्षेत्राची नोंद पूर्ण केल्यानंतर पंचनाम्यांचा अहवाल शासनाच्या पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात येणार आहे.