

महाबळेश्वर : ‘स्वच्छ महाबळेश्वर, सुंदर महाबळेश्वर’ असे बिरुद मिरवणाऱ्या, देश व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित महाबळेश्वर पालिकेच्या स्वच्छतेच्या दाव्यांना प्रत्यक्षात मात्र हरताळ फासला गेला आहे. शहरात मुख्याधिकारी आणि आरोग्य विभागाच्या मोठया ठेकेदाराच्या मिलिभगतने शहरातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. ठेकेदाराकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना साधे मास्क, गमबूट व ग्लोजही दिले जात नाहीत. मुख्याधिकारीच या ठेकेदारावर मेहरबान असल्याने सफाई कामगरांच्या जीवाशी मात्र खेळ होत आहे.
महाबळेश्वर शहरातील कचरा उचलण्यासाठी पालिका व्ही. डी. के. फॅसिलिटी सर्व्हिसेस या कंपनीला वर्षाकाठी तब्बल पावणे चार कोटी रूपये देते. मात्र, कोट्यवधी रूपये देवूनही महाबळेश्वरकरांना बकालपणाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे स्वच्छतागृहांची दूरवस्था झाली असताना ठिकठिकाणी कचऱ्याचेही ढीग लागले आहेत. हे ढीगही संबंधित ठेकेदाराकडून उचलले जात नाही.
पालिका हद्दीतील घरोघरी व गल्लीबोळांत घंटागाडींसोबत कचरा उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू आहे. शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. ठेकेदाराकडून कामगारांना ना मास्क, ना गमबूट, ना ग्लोज देण्यात आले आहेत. प्रचंड दुर्गंधी व कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हे कामगार नाईलाजाने काम करत असून, त्यांच्या जीवाशी जणू खेळ सुरू आहे. नाले व गटारे साफ करणारे कामगार कोणतीही सुरक्षासाधने न वापरता गटारात उतरून गाळ व कचरा काढत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे.
विशेष म्हणजे, हे काम त्यांना थेट हाताने करावे लागत असून, कोणतेही सुरक्षाकवच ठेकेदाराकडून पुरवले जात नाही. अपुरे मनुष्यबळ, किमान वेतन कायद्यानुसार वेतन न मिळणे, वेतनासोबत इतर कायदेशीर लाभांपासून वंचित ठेवणे, तसेच वेळेवर पगार न मिळाल्याने कामगार आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. अनेक स्थानिक कामगारांनी काम सोडल्याने बाहेरून कामगार आणून ठेकेदार तात्पुरता कारभार चालवत असल्याचे चित्र आहे.
कागदोपत्री ठेकेदाराकडे 97 कामगार (57 महिला व 40 पुरुष), दोन डंपर व पाच लहान वाहने असल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र एवढे कामगार किंवा वाहने कामावर दिसत नाहीत. त्यामुळे ठेकेदाराकडून नुसता गोलमाल सुरू आहे. ठेकेदार व पालिका प्रशासनातील अर्थकारणाच्या अभद्र युतीमुळे महाबळेश्वर शहराच्या स्वच्छतेची अक्षरशः दैना उडाली आहे. पूर्वी पालिकेकडे थेट जबाबदारी असताना स्वच्छतेची कामे नियमित होत होती; मात्र आता स्वच्छतेलाच हरताळ फासल्याचे चित्र आहे.