Satara News : म‌’श्वरमधील रस्ता काँक्रिटीकरणाची कामे दर्जाहीन

नगरसेवक कुमार शिंदे : लॉडविक पॉईंट रस्त्याचे काम पाडले बंद
Mahabaleshwar Road Work
म‌’श्वरमधील रस्ता काँक्रिटीकरणाची कामे दर्जाहीन
Published on
Updated on

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरातील लॉडविक पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामावर निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप नगरसेवक कुमार शिंदे यांनी केला आहे. हे काम सत्ताधाऱ्यांच्या ठेकेदारधार्जिण्या भूमिकेचे द्योतक असल्याची टीका करत कुमार शिंदे यांनी हे काम बंद पाडले.

आर.आर. हेरिटेज रिसॉर्ट ते ग्लेन गेरी बंगलो मार्गे लॉडविक पॉईंटकडे जाणाऱ्या पर्यायी रस्त्याचे काँक्रिटीकरण काम पुण्यातील मे. जी व्ही डी एम्पायर इंडिया प्रा. लि. या ठेकेदाराला देण्यात आले असून, या कामासाठी सुमारे 10 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र कामाचा दर्जा राखला जात नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळल्याचा दावा शिंदे यांनी केला. सुमारे 1200 मीटर लांबीच्या या कामापैकी 400 मीटर काम पूर्ण झाले असून, सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या गुणवत्तेसाठी आवश्यक असलेले नमुने उपलब्ध नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच काँक्रिट टाकण्यासाठी वापरली जाणारी पेव्हर मशीन न वापरता केवळ हाताने लेव्हलिंग करुन काम सुरु असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. या कामाच्या देखरेखीसाठी बांधकाम अभियंता नेमण्याऐवजी पाणीपुरवठा अभियंता नेमण्यात आल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना 2025-26 अंतर्गत महाबळेश्वर पालिकेला 64 कोटींहून अधिक निधी मिळाला असूनही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना शिंदे म्हणाले, पालिका प्रशासन ठेकेदाराला झुकते माप देत असून शहरातील विकासकामे वेळेत पूर्ण होत नाहीत. या प्रकाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची गुणवत्ता तपासणी होईपर्यंत काम थांबवावे, अशी मागणी करून जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी अल्ताफ मानकर, सुमित कांबळे आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news