Mahabaleshwar Rainfall: महाबळेश्वरात पावसाचा कहर; ६००० मिमीचा टप्पा पार

तीन दिवसांपासून मुसळधार ; धुके, थंडी अन् वर्षा पर्यटनाचा आनंद: खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर
Mahabaleshwar Rainfall: महाबळेश्वरात पावसाचा कहर; ६००० मिमीचा टप्पा पार
Published on
Updated on

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहर व परिसरात यंदाच्या मान्सूनने अक्षरशः दाणादाण उडवली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, रक्षाबंधनासह शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. दाट धुके, संततधार पाऊस आणि कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.

यंदाच्या पावसाने ६ हजार मिमीचा टप्पा पार केला असून २९ ऑगस्टअखेर ६०४७.३० मिमी (२३८.०८३ इंच) पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ५३३४.५० मिमी (२१०.०२० इंच) पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत सुमारे २८ इंचांनी अधिक पाऊस झाला आहे.

जून महिन्यात पावसाने काहीशी दडी मारल्याने महाबळेश्वर परिसरात चिंतेचे वातावरण होते. मात्र, जूनअखेरीस सुरू झालेल्या दमदार पावसाने जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांत जोरदार हजेरी लावली. त्यानंतर जुलैअखेरीस आणि ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांतही पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे यंदाच्या पावसाने आतापर्यंत द्विशतकाचा टप्पा पार केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा पावसाने जोर धरला असून दररोज दोन ते चार इंचांदरम्यान पावसाची नोंद होत आहे. २८ ऑगस्ट सकाळी ८.३० ते २९ ऑगस्ट सकाळी ८.३० या २४ तासांत १०१.७० मिमी (४.००४ इंच) पाऊस झाला.

सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. वेण्णा तलाव परिसर, लिंगमळा धबधबा, केट्स पॉईंट, आर्थर सीट यासह विविध प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. सायंकाळी मुख्य बाजारपेठेतही खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. थंडगार वातावरणात गरमागरम मका, पॅटिस, फ्रँकी, आलेदार चहा, मॅगी अशा खाद्यपदार्थांवर पर्यटक ताव मारताना दिसत आहेत. स्वेटर, शाल, जॅकेट, कानटोपी परिधान करून पर्यटक थंडीचा आनंद घेत आहेत. पावसापासून बचावासाठी प्लास्टिकच्या पॉन्चोचा वापरही वाढला असून, पॉन्चो परिधान करून पर्यटक बाजारपेठेत खरेदी करताना दिसत आहेत.

खड्ड्यांमुळे रस्त्यांची दैनादरवर्षीप्रमाणे यंदाही महाबळेश्वर-पाचगणी मार्गासह शहरांतर्गत अनेक रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी गुडघाभर खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवून रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news