

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या दमदार पावसात आंबेनळी घाटातील पोलादपूर हद्दीत दरड कोसळल्यामुळे राडारोडा रस्त्यावर आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अखेर पोलादपूर प्रशासनाने ही दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला
गेल्या वर्षी ०१ जून ते ०१ जुलैदरम्यान १ हजार ५०७.८० मिमी ५९.३६२ इंच पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र पावसाने काहीशी संथ सुरुवात केली आहे यंदा ०१ जून ते १ जुलै या एका महिन्यात ४७०.२८ मिमी १८.५२ इंच पावसाची नोद झाली आहे. अर्धा जून महिला कोरडा गेला होता. महाबळेश्वरकरांसह शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले होते. मात्र, आता पावसाने चांगलाच जोर धरला आहे. बुधवारी दिवसभर पावसाची चांगलीच रिपरिप सुरु होती. या पावसामुळे वेण्णा तलावाच्या पाणी पातळीमध्ये काहीशी वाढ झाली आहे.
आणखी काही दिवस असाच पाऊस राहिल्यास या महिन्याच्या दुसऱ्या आठड्यामध्ये वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागेल. गतवर्षी शेतीच्या कामांना देखील आता वेग आला आहे. सध्या वर्षा पर्यटनास सुरुवात झाली असून वीकएंडला पर्यटक दाखल होत आहेत.