Mahabaleshwar Panchgani rain: महाबळेश्वर-पाचगणीत पावसाच्या सरी

ढगाळ वातावरणासह मान्सूनपूर्वची हजेरी; गारव्याने पर्यटक सुखावले
Rain
Rain pudhari
Published on
Updated on

पाचगणी : महाबळेश्वर व पाचगणी शहरासह तालुक्याच्या काही भागात गुरुवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. महाबळेश्वरमध्ये तुरळक तर पाचगणीत सुमारे एक तास पावसाने हजेरी लावली. अचानक वातावरणात बदल झाल्याने सर्वत्र गारवा पसरला. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून उन्हापासून अंगाची लाही लाही करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला. या पावसातही पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेतला.

दुपारपर्यंत कडक उन्हामुळे बाजारपेठ आणि पर्यटनस्थळांवर नागरिक त्रस्त झाले होते. सायंकाळी शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले. यानंतर काही वेळातच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या सरींसोबत वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे आल्हाददायक बदल जाणवू लागला.

महाबळेश्वरमध्ये तुरळक सरी कोसळल्या तर पाचगणीत एक तास पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलके धुकेही पसरल्याने डोंगरदऱ्यांचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. पावसामुळे तापमानातही काही अंशांनी घट झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

उन्हाळी सुट्ट्यांमुळे सध्या महाबळेश्वर आणि पाचगणी येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. राज्यासह परराज्यातूनही अनेक पर्यटक या थंड हवेच्या ठिकाणी दाखल होत आहेत. अशातच पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने पर्यटकांचा आनंद अधिकच द्विगुणित झाला. दोन्ही शहरातील विविध पॉईंटस्‌‍, वेण्णा लेक, टेबल लँड येथे पर्यटकांनी गर्दी केली होती.

पावसात भिजत पर्यटकांचे फोटोसेशन

अनेक पर्यटक पावसात भिजत सेल्फी आणि छायाचित्रे काढताना दिसत होते. काहीजणांनी घोडेस्वारी, फिरस्ती आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. ढगाळ वातावरणामुळे डोंगररांगा धुक्यात हरवल्याचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी विविध पॉईंटवर गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news