

सातारा : अल्हाददायक वातावरण, घनदाट जंगल अन थंड आणि स्वच्छ हवेसाठी प्रसिध्द असलेली महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळांनी आता युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
‘युनेस्को’ च्या भारतातील स्थायी समितीने याबाबतची प्रसिद्धिपत्रकाद्वारे घोषणा केली आहे. महाबळेश्वर, पाचगणी हे केंद्र सरकारने 1985 मध्ये घोषित केलेल्या कोयना अभयारण्याचा भाग आहेत. त्यानंतर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत हा परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला. जागतिक वारसा यादीत अंतिम समावेश होण्यापूर्वी ठिकाणांचा तात्पुरत्या यादीत समावेश होणे बंधनकारक असते. त्यामुळे वारसा संवर्धनासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. या परिसरात प्राणी, पक्ष्यांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती, संकटग्रस्त प्रजाती आढळतात.
महाबळेश्वर, पाचगणीचा परिसर फ्लड बॅसॉल्ट ज्वालामुखी या प्रकाराच्या अभ्यासासाठीचे हे आदर्श ठिकाण आहे. त्यामुळे या प्रदेशाला जागतिक स्तरावर भौगोलिक महत्त्व आहे. तसेच, हा भाग पृथ्वीच्या इतिहासातील सर्वांत नाट्यमय घटनांपैकी एक असलेल्या ‘क्रेटेशसइपेलिओजिन वंशविनाश’ घटनेशी थेट संबंध असल्याचे मानले जाते.
पश्चिम घाटातील आणखी दोन ठिकाणे वाढली
महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील राधानगरी अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना अभयारण्य, कास पठार यांना याआधीच युनेस्कोने वारसास्थळांचा दर्जा दिला आहे. पन्हाळा, प्रतापगड किल्ल्यांचाही नुकताच या यादीत समावेश करण्यात आला होता. त्यानंतर आता महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन नैसर्गिक हॉट स्पॉटची भर पडली आहे.