Mahabaleshwar municipality: पालिकेच्या ताफ्यात शववाहिनी दाखल

दै. ‌‘पुढारी‌’ने वेधले होते लक्ष : म‌’श्वर नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा पाठपुरावा यशस्वी
Mahabaleshwar municipality
Mahabaleshwar municipality
Published on
Updated on

महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेच्या ताफ्यात तब्बल दोन दशकांहून अधिक काळ सेवा दिलेल्या एकमेव ‌‘शववाहिनी‌’च्या दयनीय अवस्थेबद्दल दै. ‌‘पुढारी‌’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध करत आवाज उठवला होता. अखेर ‌‘पुढारी‌’च्या या वृत्तांची दखल घेत महाबळेश्वर पालिकेच्या ताफ्यात शववाहिनी दाखल झाली आहे. नगराध्यक्ष सुनील शिंदे व आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. पालिकेस सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आधुनिक, सुसज्ज व वातानुकूलित शववाहिनी उपलब्ध झाली असून महाबळेश्वरकरांची होणारी परवड काहीअंशी थांबणार आहे.

महाबळेश्वर पालिकेच्या वाहन ताफ्यात असलेल्या शववाहिनीची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. गेल्या दोन-तीन वर्षांपासून या शववाहिनीस घरघर लागली होती. पालिकेच्या ताफ्यातील एकमेव शववाहिनी नादुरुस्त झाल्यामुळे व पर्यायी वाहन नसल्याने त्याच गाडीची दुरुस्ती करून वापर केली जात होती. तब्बल दोन दशके सेवा देत असलेली ही शववाहिनी वारंवार बंद पडत असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

अंत्ययात्रेदरम्यान गाडी बंद पडल्यास नातेवाईकांनाच धक्का मारावा लागत होता. आतमधील आसनव्यवस्था, गंजलेले दरवाजे व खिडक्या या पालिकेच्या कारभाराची जणू साक्ष देत होत्या. अनेक वेळा रस्त्यातच गाडी बंद पडल्याने कुटुंबीयांची मोठी गैरसोय होत होती. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही या ढकल-स्टार्ट वाहनामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.

या सर्व पार्श्वभूमीवर दै. ‌‘पुढारी‌’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध करत हा प्रश्न ऐरणीवर आणला होता. त्यानंतर मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे शववाहिनी खरेदीसाठी पत्र दिले होते. मात्र, काही काळ या प्रक्रियेत विलंब होत होता. जुनी शववाहिनी निवृत्त झाल्यानंतर पार्थिव वाहतुकीसाठी रुग्णवाहिका किंवा खासगी मालवाहतूक वाहनांचा वापर करावा लागत होता. काही वेळा पार्थिव वाहतुकीतही अडचणी निर्माण होत होत्या. अखेर महाबळेश्वर पालिकेस सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आधुनिक, सुसज्ज व वातानुकूलित शववाहिनी उपलब्ध झाली आहे. नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील, यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही नूतन शववाहिनी पालिकेस मिळाली असून महाबळेश्वरकरांची होणारी परवड आता थांबणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news