

महाबळेश्वर : महाबळेश्वरचे नाव जगभर व्हावे, या उद्देशाने या महापर्यटन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलला लाजवेल असा हा उत्सव असून, तो जागतिक पातळीवर नेला जाईल. या उत्सवासाठी जापनीज् कंपनीने आपल्याला मदत केली आहे. या पर्यटन उत्सवाचे यशस्वी आयोजन झाल्याने पर्यटन व रोजगार वाढेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, ना. जयकुमार गोरे, आ. तुकाराम काते, पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय सचालक मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, पर्यटन संचलनालयाचे संचालक बी. एन. पाटील, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, अधीक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे, जितेंद्र सोनावणे, हनुमंत हेडे, संजय वेकणे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार तेजस्विनी पाटील, मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ना. एकनाथ शिंदे म्हणाले, हा पर्यावरणपूरक उत्सव आहे. सध्याच्या घडीला हा उत्सव तीन दिवसही कमी पडणार आहे. या पर्यटन उत्सवात हेलिकॉप्टरची राईड ठेवण्यात आली असून त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मी गावी आलो की दोन-पाच हजार झाडे लावून जातो. ग्लोबल वॉर्मिंगसाठी झाडे लावली पाहिजेत. बांबू लागवड केली आहे. सात आठ हजार हेक्टर बांबूची लागवड केली आहे. बांबू वेगवेगळ्या ठिकाणी उपयोगी पडतो. त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. दुर्गम भागातील लोकांनी जमीन कोणी विकू नये. जे पिकवाल ते विकले जाणार आहे. नोकरी धंद्यासाठी मुंबईला कोणी स्थलांतर करू नये. अनेक देश-राज्य पर्यटनावर चालतात. आपल्याकडे पर्यटनाला चालना देण्यासारखे आहे. त्यासाठी सरकारकडून काम केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
ना. शिंदे म्हणाले, महायुतीचे सरकार प्रिंटीग मिस्टेक सरकार नाही. महायुती सरकार जे बोलते ते करून दाखवते. विरोधकांनी लाडक्या बहिण योजनेत खोडा घातला. मात्र, त्यांचा सुपडा साफ झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. मी गावी आलो की लोक लगेच बातम्या सोडतात. एकनाथ शिंदे नाराज म्हणे पण हेलिकॅाप्टरने आलो तर माझा वेळ वाचतो. मी त्या वाचलेल्या सहा तासात दोन दोन पेनाने सही करतो. मात्र, काही लोक पेनच बाहेर काढत नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केली.