

सातारा : मधमाश्यांच्या पेट्या शेतात, जंगलात, बागेत ठेवल्या जात असतात. त्यावेळी मधमाश्यांच्या संरक्षणासाठी झटका मशिनचा वापर केला जातो. प्रामुख्याने अस्वल व जंगली प्राण्यांपासून मधमाश्यांची पेटी वाचवण्यासाठी केला जातो. ही मशिन सौरऊर्जेवर काम करते. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दाभे, रेणोशी, खरोशी या गावांतील 8 ते 10 शेतकऱ्यांनी हा नावीन्यपूर्ण प्रयोग राबवल्याने या मशिनच्या वापरामुळे अस्वलासह अन्य जंगली प्राण्यापासून या मधपेट्या वाचण्यास मदत झाली आहे.
सातारा जिल्ह्यात दुर्गम भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मधमाशी पालन व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील मधाची गोडी राज्यभर दरवळू लागली आहे. या मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे. जंगली, डोंरगरी व दुर्गम भागात वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचा फटका मधमाशी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. मधमाश्यांच्या पेट्यांचे रानडुक्कर, अस्वल किंवा इतर वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी सोलर झटका मशिन हा एक अतिशय प्रभावी व सुरक्षित उपाय काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात राबवला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दाभे, रेणोशी, खरोशी या गावांतील 8 ते 10 शेतकऱ्यांनी हा नावीन्यपूर्ण प्रयोग राबवला आहे.
झटका मशिनला विजेची गरज नसल्याने ती सोलर पॅनेलवर चार्ज होत आहे. सोलरवर चालत असल्याने विजेचे बिल येण्याचा प्रश्नच नाही. मधपेट्यांच्या संरक्षणासाठी रात्री शेतात थांबण्याची गरज नाही. प्राण्यांना किंवा मानवाला जीवघेणा धक्का न बसता केवळ सौम्य झटका बसतो, ज्यामुळे प्राणी या ठिकाणापासून दूर पळतात. पेट्यांच्या भोवती बारीक तारांचे कुंपण करून ही मशिन जोडली जाते. रानडुक्कर, अस्वल, माकड व अन्य वन्य प्राण्यांपासून, तसेच चोरट्यांपासून पेट्यांचे संरक्षण होण्यास मदत होत आहे.