

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात शुक्रवारी पावसाची संततधार कायम होती. गेल्या अडीच महिन्यांपासून बरसणार्या पावसाने 5 हजार मिमीचा टप्प्या पूर्ण केला आहे. आठ दिवसांपासून मुसळधार कोसळणार्या पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. संततधार पाऊस सुरू असल्याने हवेत गारठा कायम आहे. पावसामुळे भेकवली स्टॉपनजीक झाडाची फांदी तुटल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती.
महाबळेश्वर तालुक्यात यंदाच्याही मोसमात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे तालुक्यातील पाऊस द्विशतकाच्या उंबरठ्यावर आहे. जोरदार वार्यामुळे शुक्रवारी सकाळी महाबळेश्वर - मेढा रस्त्यावर सकाळी आठच्या सुमारास भेकवली स्टॉप नजीक मोठ्या झाडाच्या पडलेल्या फांद्यांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.या झाडाच्या फांद्या वन विभागामार्फत हटवण्यात आल्या व वाहतूक पूर्ववत सुरु झाली. सध्या शहर व परिसरात कडाक्याची थंडी व दाट धुके पसरले असून शनिवार व रविवार या या विकेंड मुळे पर्यटकांची रेलचेल या निसर्गरम्य पर्यटनस्थळी पहावयास मिळत आहे. पावसाने उसंत घेतली असली तरी लिंगमळा धबधब्यासह अंबेनळी घाटातील छोटे-मोठे धबधबे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.