Ambenali Ghat: भय इथले संपत नाही !

संरक्षक कठडे नसल्याने आंबेनळी घाट धोकादायक
Ambenali Ghat: भय इथले संपत नाही !
Published on
Updated on
प्रेषित गांधी

महाबळेश्वर : राज्यातील पश्चिम घाटातील महत्त्वाचा घाटमार्ग म्हणून ओळखला जाणारा महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यानचा आंबेनळी घाट पुन्हा एकदा भीषण अपघातांमुळे चर्चेत आला आहे. महाबळेश्वर या पर्यटनस्थळाला कोकणाशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून, सतत होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकत्याच पोलादपूर हद्दीतील दाभीळ परिसरात झालेल्या भीषण अपघातात कार हजार फूट खोल दरीत कोसळून आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर घाटरस्त्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही केल्या भय इथले संपत नाही, अशी स्थिती वर्पानुवर्षे कायमच आहे.

महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यानचा आंबेनळी घाट डेंजरझोन म्हणून ओळखला जातो. पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला आंबेनळी घाट रस्ता डिसेंबर 2024 पासून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. सध्या काही ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू असली, तरी महाबळेश्वर हद्दीतील घाटरस्ता अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अनेक ठिकाणी संरक्षक कठडे, रेलिंग आणि सुरक्षाभिंती नसल्याने मोठ्या अपघातांचा धोका कायम आहे.महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे प्रमुख पर्यटनस्थळ असून, दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. विशेषतः पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य, धबधबे आणि धुक्याचा अनुभव घेण्यासाठी हजारो पर्यटक आंबेनळी घाटमार्गाचा वापर करतात. मात्र, घाटरस्त्यांची दुरवस्था आणि सुरक्षेचा अभाव यामुळे प्रवास धोकादायक बनला आहे.

आंबेनळी घाटात यापूर्वीही अनेक भीषण अपघात झाले आहेत. 28 जुलै 2018 रोजी दाभीळ गावाजवळील घाटरस्त्यावर खासगी बस सुमारे सहाशे फूट दरीत कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही या मार्गावर अनेक लहान-मोठे अपघात घडले. काही महिन्यांपूर्वी वाई येथील एका दांपत्याचाही अपघातात मृत्यू झाला होता. नुकताच तरुणांचा झालेला अपघात हा 2018 मधील दुर्घटनेच्या परिसरापासून अवघ्या काहीशे मीटर अंतरावर घडल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.2018 नंतर शासनाने काही ठिकाणी संरक्षक कठडे आणि सुरक्षाभिंती उभारण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, अनेक ठिकाणी ही कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. काही भागात रस्ता रुंदीकरण आणि दुरुस्तीची कामे संथ गतीने सुरू असून, तात्पुरत्या उपाययोजना म्हणून फक्त मातीचे भराव करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news