Maan rain damage | माणमध्ये घरांची पडझड; शेतीचे नुकसान

माणगंगा नदीवर बहुतांशी पूल पाण्याखाली : कांद्याची ऐरण पाण्यात
Maan flood impact
शिंदी खुर्द येथील कदम यांच्या शेतात साठवलेला कांदा ऐरणीसकट पाण्याखाली गेल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.pudhari photo
Published on
Updated on

दहिवडी : माण तालुक्यात पावसाने सोमवारी विश्रांती घेतली असली तरी रविवारी झालेल्या पावसाने तालुक्यात फार मोठे नुकसान झाले आहे. माणगंगा नदीवरील अनेक पुलांवर पाणी आल्याने अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले, तर काही ठिकाणी घरे पडली, शेतीचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे 47 टँकर प्रशासनाने बंद केले असून अवघे पाचच टँकर सुरू ठेवण्यात आले आहेत.

माण तालुक्यात गेले काही दिवस झाले चांगला पाऊस सुरू आहे. रविवारी तर पावसाने कहर केला. दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. माणगंगा नदी दुथडी भरून वाहत असून अद्यापही अनेक रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात आले आहेत. दहिवडी ते मार्डी रस्ता अजून वाहतुकीस बंद आहे. गोंदवले बुद्रुक येथील माणगंगा नदी वरील स्मशानभूमी जवळील पूल खचला आहे.

महादेव कट्टे यांच्या घराजवळील पूल पावसाने खचला आहे. गोंदवले ते नरवणे रस्त्यावरील पूल खचला आहे. तसेच फडतरे वस्ती रस्ता बंधार्‍यावरील पूल व झळके वस्ती रस्ता खचला आहे. गोंदवले बुद्रुक येथील हे चारही पूल वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. बिदाल येथील भैरवनाथ मंदिरापासून माईंनकर वस्तीकडे जाणार्‍या रस्त्यावर नदी वरील पूल वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे येथे असणार्‍या पाच वस्त्यांवर जाणारा रस्ता बंद झाला आहे. अशीच अवस्था तालुक्यात अनेक ठिकाणी झाली आहे.

पावसाचे पाणी शेतात साठून राहिल्याने मका व कडवळ पिकांचे मोठे नुकसान झाले. रब्बी हंगामात उत्पादन केलेल्या कांद्याच्या ऐरणी पाण्याखाली गेल्या. कांदा भिजून व कांदा वाहून गेल्याने बिदाल, आंधळी परिसरातील कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात मुबलक पाऊस झाल्याने तालुक्यातील 47 टँकर बंद करण्यात आले आहेत. रांजणी, मोही, खडकी, वरकुटे-म्हसवड व खुटबाव या पाच गावात पाच टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता वैभव मडके यांनी दिली.

पळशीतील चार कुटुंबांचे स्थलांतर...

पळशी येथील माणगंगा नदी काठची चार कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांच्या घरात लहान मोठी एकूण 19 माणसे आहेत. त्याचबरोबर 6 जर्सी गायी, 3 म्हैशी,16 शेळ्या, 52 लहान मोठी मेंढरे यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news